भारताचा सहिष्णुतेचा इतिहास कोणीही बदलू शकणार नाही
By Admin | Updated: February 7, 2015 02:39 IST2015-02-07T02:39:38+5:302015-02-07T02:39:38+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतातील असहिष्णुतेबाबत व्यक्त केलेल्या चिंतेबाबत भारत सरकारने सावध प्रतिक्रिया दिली आहे.

भारताचा सहिष्णुतेचा इतिहास कोणीही बदलू शकणार नाही
सरकारची प्रतिक्रिया: ओबामा म्हणाले होते भारतात असहिष्णुता वाढली
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतातील असहिष्णुतेबाबत व्यक्त केलेल्या चिंतेबाबत भारत सरकारने सावध प्रतिक्रिया दिली आहे. संयम, सहिष्णुता हा भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा महत्त्वाचा भाग असून, हा इतिहास कोणीही बदलू शकत नाही असे भारताने म्हटले आहे.
अर्थमंत्री अरुण जेटली व गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. भारतात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात ही बाब त्यांनी रेखांकित के ली. ओबामा बोलत होते, तेव्हा त्यांच्याजवळ तिबेटी धर्मगुरूदलाई लामा बसले होते. दलाई लामा गेली कित्येक वर्षे भारतात आपल्या अनुयायांसह राहत असून, हीच बाब सहिष्णुतेची निदर्शक आहे असे राजनाथ म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
व्हाईट हाऊसकडून सारवासारव
वॉशिंग्टन : गेल्या काही वर्षात भारतात असहिष्णुता इतकी वाढली आहे, की जन्मभर अशा धार्मिक तेढीविरोधात आग्रही असणाऱ्या महात्मा गांधीजींनाही यामुळे धक्का बसला असता, असे मत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी गुरुवारी व्यक्त केले होते. मोदी सरकारला सणसणीत चपराक असल्याचे मानले जात असलेल्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला. भारतात अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना हा भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप असल्याचा घणाघात केला होता. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने आज सारवासारव केली असून, जगातील कोणत्याही देशातील असहिष्णुतेचा सामना करण्यासाठी गांधीजींचे विचार आजही प्रेरक ठरतात असे म्हटले आहे.
ओबामा यांनी हे वक्तव्य करताना कोणत्याही धर्माचा उल्लेख केला नाही; पण या वक्तव्यामुळे भारतात खळबळ माजल्यानंतर व्हाईट हाऊसने तातडीने यावर स्पष्टीकरण दिले.
महात्मा गांधीजींचा वारसा ही मोठीच प्रेरणा आहे. अमेरिकेत, जगात कोणत्याही देशात असहिष्णुतेची घटना घडली तर गांधीजींचे विचारच प्रेरक ठरतात, असे व्हाईट हाऊसच्या सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते मार्क स्ट्रोह यांनी सांगितले.