११९पेक्षा जादा जागा नाहीच
By Admin | Updated: September 22, 2014 09:46 IST2014-09-22T02:36:27+5:302014-09-22T09:46:00+5:30
भाजपाला ११९ जागांपेक्षा एकही जागा वाढवून देऊ शकत नाही. भाजपाने आपण घेणारे आहोत देणारे नाही याचे भान राखावे अन्यथा शिवसेनेचा नाईलाज होईल.

११९पेक्षा जादा जागा नाहीच
मुंबई : भाजपाला ११९ जागांपेक्षा एकही जागा वाढवून देऊ शकत नाही. भाजपाने आपण घेणारे आहोत देणारे नाही याचे भान राखावे अन्यथा शिवसेनेचा नाईलाज होईल. शिवसेनेला कस्पटासमान लेखाल तर आमचे वाघ तयार आहेत, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिला. तसेच याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी त्यांनी भाजपाला सोमवार दुपारपर्यंतची मुदत दिली आहे.
युती राहो अथवा तुटो मी लढायला उभा आहे. तुम्ही माझ्यासोबत आहात. ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आयुष्यातील शेवटची परीक्षा आहे. यामध्ये पास झालो तर पुन्हा आपली परीक्षा घेण्याची कुणाची हिंमत होणार नाही, असे भावनिक आवाहनही ठाकरे यांनी राज्य कार्यकारिणीत शिवसैनिकांना केले.
उद्धव यांची रविवारची भाषा अत्यंत आक्रमक व तिखट होती. त्यांची देहबोली आव्हानात्मक होती. युतीबाबत ठाकरे बोलत होते, तेव्हा उपस्थित शिवसैनिक त्यांच्या जयजयकाराचे चित्कार अन् भाजपाचा धुत्कार करीत होते. राज्यातील भाजपा नेत्यांनी उकरून काढलेल्या जुन्या विषयांवर भाजपाला उत्तर देताना प्रतिभाताई पाटील व प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याचा अभिमान वाटतो, असे सांगत ठाकरे यांनी सेनेच्या भूमिकेचे समर्थन केले. शिवसेना १५१, भाजपा ११९ तर मित्रपक्षांना १८ जागा देण्याचा अंतिम फॉर्म्युला वाहिन्यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी मांडला. मित्रपक्षांना द्यायच्या सर्व जागा शिवसेना देईल. हे धोंडे शिवसेना पदरात घेईल, असे ठाकरे म्हणाले. (प्रतिनिधी)