राजपथावर नो फ्लाईंग झोन अशक्यच - भारताचा अमेरिकेच्या सुरक्षा दलांना नकार
By Admin | Updated: January 18, 2015 13:50 IST2015-01-18T09:27:36+5:302015-01-18T13:50:31+5:30
प्रजासत्ताक दिनी राजपथ आणि सभोवतालचा पाच किलोमीटरचा परिसर नो फ्लाईंग झोन करणे शक्य नाही असे सांगत भारताने अमेरिकेच्या सुरक्षा दलांची मागणी फेटाळून लावली आहे.

राजपथावर नो फ्लाईंग झोन अशक्यच - भारताचा अमेरिकेच्या सुरक्षा दलांना नकार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - प्रजासत्ताक दिनी राजपथ आणि सभोवतालचा पाच किलोमीटरचा परिसर नो फ्लाईंग झोन करणे शक्य नाही असे सांगत भारताने अमेरिकेच्या सुरक्षा दलांची मागणी फेटाळून लावली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने राजपथ परिसर नो फ्लाईंग झोन करण्याची मागणी भारताकडे केली होती.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत दौ-यावर येत आहेत. प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणा-या कार्यक्रमाचे ते प्रमुख पाहूणे उपस्थित राहणार आहेत. ओबामांच्या दौ-याच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी अमेरिकेतील ओबामांच्या सुरक्षा पथकाने भारतातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला होता. ओबामांच्या सुरक्षेसाठी राजपथ आणि त्या सभोवतालचा ५ किलोमीटरचा परिसर नो फ्लाईंग झोन म्हणून घोषीत करावा अशी मागणी सुरक्षा पथकांनी भारताच्या हवाई वाहतूक मंत्रालयाकडे केली होती. मात्र यादिवशी हवाई दलातर्फे चित्तथरारक कसरती दाखवल्या जातात. प्रजासत्ताक दिनी राजपथ परिसर नो फ्लाईंग झोन केला तर हवाई दलाच्या विमानांना कसरती दाखवता येणर नाही. त्यामुळे भारतीय सैन्याने हा भाग नो फ्लाईंग झोन म्हणून घोषीत करण्यास नकार दिला. मात्र सैन्याने नकार दिल्यावरही अमेरिका भारताच्या हवाई वाहतूक विभागाच्या संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यंदा प्रजासत्ताक दिनी १८ फायटर जेट, ५ एअरक्राफ्ट आणि १० हेलिकॉप्टर हवाई कसरतींमध्ये सहभागी होणार आहे. जमिनीपासून ६० मीटर ते ३०० मीटरच्या उंचीपर्यंत ही विमान कसरती सादर करतील.