लग्नाला अनेक वर्ष उलटूनही अपत्यप्राप्ती होत नसल्याने अनेक जोडपी विविध वैद्यकीय मार्गांनी अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करत असतात. मात्र यातील काहीजण वाट चुकून तांत्रिक मांत्रिकांच्या नादी लागतात आणि त्यातून गंभीर गुन्हे घडतात. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे घडली आहे. येथे अपत्यप्राप्तीचे आमिष दाखवून एका तांत्रिकाने महिलेवर बलात्कार केल्याचे नौझील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या प्रकरणातील पीडित महिलेच्या लग्नाला आठ वर्ष झाली होती. मात्र तिला अपत्यप्राप्ती झाली नव्हती. त्यामुळे चिंतीत असलेली ही महिला मुश्ताक नावाच्या तांत्रिकाकडे गेली. त्याने मंत्रतंत्राच्या मदतीने गर्भधारणा करून देतो, असे या महिलेला सांगितले. त्यानंतर ही महिला त्याच्याकडे गेली असता त्याने तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर पीडित महिला कशीबशी घरी पोहोचली. तसेच तिने आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य विचारात घेत पोलिसांनी आरोपी मुश्ताक अली याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलीस अधीक्षक सुरेशचंद्र रावर यांनी सांगितले की, आरोपी मुश्ताक अली हा ही घटना घडल्यापासून फरार आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांची अनेक पथके काम करत आहेत. तसेच त्याच्या शोधासाठी काही ठिकाणी धाडीही घालण्यात येत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर खळबळ उडाली असून, सदर तांत्रिक चमकारांचं आमिष दाखवून भोळ्याभाबड्या लोकांना शिकार बनवायचा.