नवी दिल्ली : दलितांसाठीच्या आरक्षणात कोणताही बदल केला जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. कुणीही दलितांचा अधिकार हिरावून घेऊ शकणार नाही, याबाबत विरोधकांनी असत्य पसरवण्याचा प्रयत्न चालविला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दिल्लीतील राष्ट्रीय स्मारकाच्या शिलान्यासप्रसंगी बोलताना मोदींनी बाबासाहेबांची तुलना मार्टिन ल्युथर किंग यांच्याशी केली. आंबेडकर स्मृती व्याख्यान देताना ते म्हणाले की, दलित, आदिवासींच्या आरक्षणाबाबत काहीही नवे घडले नाही. वाजपेयी पंतप्रधान असताना आरक्षण रद्द केले जाईल असा प्रचार केला जात होता. ते दोन टर्म पंतप्रधान असताना अशा प्रकारचे काहीही घडले नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक ऐक्य निर्माण केले आणि सरदार पटेल यांनी राजकीयदृष्ट्या हा देश एक केला. या दोघांचे भारतावर अनंत उपकार आहेत. दिल्लीतील अलीपूर रोड भागात हे स्मारक उभारले जाणार असून, २0१८ साली ते पूर्ण होईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
आरक्षण धोरणात बदल नाही - मोदी
By admin | Updated: March 22, 2016 04:24 IST