राजीनामा मागे घेण्यास नितीश यांचा नकार

By Admin | Updated: May 19, 2014 02:53 IST2014-05-19T02:53:42+5:302014-05-19T02:53:42+5:30

लोकसभा निवडणुकीत एकही जागा जिंकू न शकलेल्या लालूप्रसाद यादव यांना हा दुसरा जबर धक्का आहे.

Nitish refuses to withdraw his resignation | राजीनामा मागे घेण्यास नितीश यांचा नकार

राजीनामा मागे घेण्यास नितीश यांचा नकार

पाटणा : जदयु आमदारांच्या आग्रहानंतरही नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागे घेण्यास नकार दिला असतानाच लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाच्या तीन बंडखोर आमदारांनी रविवारी नितीश यांना आपला पाठिंबा देण्यासाठी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे विधानसभेत राजदचे संख्याबळ २१वर आले आहे. लोकसभा निवडणुकीत एकही जागा जिंकू न शकलेल्या लालूप्रसाद यादव यांना हा दुसरा जबर धक्का आहे. जदयु विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी रविवारी नितीशकुमार यांचीच एकमताने निवड करण्यात आली; मात्र त्यांनी पद स्वीकारण्यास आणि राजीनामा परत घेण्यास ठामपणे नकार दिल्याने कोंडी कायम राहिली. आमदारांनी नितीशकुमार यांच्याकडे राजीनामा मागे घेण्याची जोरदार मागणी केली. भावुक झालेल्या नितीशकुमार यांनी मात्र नम्रपणे नकार दिला. काही आमदारांनी तर नितीशकुमार यांच्या निवासस्थानी धरणे देण्याची धमकीही दिली. नितीश यांनी आमदारांचा रोख पाहता निर्णय घेण्यास उद्यापर्यंत मुदत मागितली असून, सोमवारी विधिमंडळ पक्षाची पुन्हा बैठक होत असल्याचे प्रवक्ते संजयसिंग यांनी सांगितले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक : बिहारमधील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची सोमवारी सकाळी १०.३० वाजता बैठक होत असल्याचे विधिमंडळ पक्षाचे नेते सदानंद सिंग यांनी सांगितले. नितीशकुमार यांच्या समर्थकांनी त्यांच्या घरासमोर गोळा होत पक्षाध्यक्ष शरद यादव यांच्याविरोधात घोषणा देत रोष व्यक्त केला. सम्राट चौधरी, रामलखन रामरमण आणि जावेद इक्बाल अशी राजीनामा देणार्‍यांची नावे आहेत. नितीशकुमार यांचे हात बळकट करण्यासाठी संयुक्त जनता दलात सामील होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: Nitish refuses to withdraw his resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.