नितीश-मांझी संघर्ष टिपेला
By Admin | Updated: February 7, 2015 02:47 IST2015-02-07T02:47:31+5:302015-02-07T02:47:31+5:30
बिहारची सत्ता पुन्हा आपल्या हाती घेऊ इच्छिणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्यातील संघर्ष सध्या टीपेला पोहोचला आहे़

नितीश-मांझी संघर्ष टिपेला
बिहार : मुख्यमंत्र्यांचा बंडाचा पवित्रा, पक्षाच्या बैठकीत पडसाद उमटणार
पाटणा : बिहारची सत्ता पुन्हा आपल्या हाती घेऊ इच्छिणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्यातील संघर्ष सध्या टीपेला पोहोचला आहे़ नितीशकुमार यांच्याच पुण्याईने मुख्यमंत्री बनलेले जीतनराम मांझी यांंनी आता जनता दल(युनायटेड) अर्थात जदयू या स्वपक्षाविरुद्धच बंडखोरीचा पवित्रा घेतल्याने या संघर्षाची तीव्रता आणखी वाढली आहे़ शनिवारी जदयू अध्यक्ष शरद यादव यांनी बोलाविलेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत या संघर्षाचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे असून मांझी यांची गच्छंती अटळ मानली जात आहे़
जदयू अध्यक्ष शरद यादव यांनी शनिवारी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे़ शिवाय बैठकीसाठी मुख्यमंत्री जीतन राम मांझी, माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह पक्षाचे १११ आमदार आणि विधान परिषदेच्या ४१ सदस्यांना नोटीस पाठवली आहे़ मात्र मुख्यमंत्री मांझी यांनी जदयू अध्यक्षांनी बोलवलेली ही बैठक बेकायदेशीर असल्याचा दावा केला असून तिला हजेरी लावण्यास नकार दिला आहे़ सभागृहाचे नेते म्हणून केवळ आपल्याला विधिमंडळ दलाची बैठक बोलविण्याचा अधिकार आहे, असा बंडाचा पावित्रा त्यांनी घेतला आहे़ शिवाय येत्या २० फेबु्रवारीला विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे़ शनिवारी मांझी दिल्लीला रवाना होत आहेत़ त्यामुळे उद्याच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला ते हजर राहणार नाहीत, हे निश्चित आहे़
सूत्रांच्या मते, मांझी यांच्या अनुपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत बिहारचे नेतृत्व पुन्हा नितीश कुमार यांच्याकडे सोपविण्याची मागणी अधिक जोरकसपणे उचलण्यात येण्याची शक्यता आहे़ अर्थात मांझी यांनी बंडाचा पवित्रा घेतल्याने हा बदल आता सोपा राहिलेला नाही़ (वृत्तसंस्था)
...तर मांझीची गच्छंती अटळ - त्यागी
मुख्यमंत्री जीतनराम मांझी शनिवारच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यास तो शिस्तभंग ठरेल आणि कदाचित यासाठी त्यांना पक्षातून बडतर्फही केले जाईल, असे जदयूचे सरचिटणीस खासदार के़सी़ त्यागी यांनी शुक्रवारी स्पष्ट केले़
पत्रकारांशी बोलताना त्यागी म्हणाले, शनिवारच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नव्या नेत्याची निवड करण्यात येईल. मांझी यांनी दिलेला शब्द पाळला नाही. मांझी यांच्या आग्रहावरूनच पक्षाध्यक्ष शरद यादव यांनी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. परंतु आता मांझी हे ही बैठक अनधिकृत असल्याचे व बैठकीला हजर राहणार नसल्याचे बोलत आहेत. पक्षाच्या घटनेनुसार पक्षाध्यक्षाला बैठक बोलावण्याचा अधिकार आहे, असे त्यागी म्हणाले़
त्यागी वेडे झाले आहेत-मांझी
संयुक्त जनता दलाचे सरचिटणीस खा. के. सी. त्यागी वेडे झाले आहेत आणि म्हणूनच ते माझ्या बडतर्फीची भाषा बोलत असल्याचे जीतन राम मांझी यांनी म्हटले आहे.
खगडिया येथे विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘विधिमंडळ पक्षाचा नेता मी आहे आणि या नात्याने बैठक बोलावण्याचा अधिकारही मलाच आहे. त्यात शिस्तभंग कुठे येतो, असा सवाल मांझी यांनी केला.
मांझी समर्थक रस्त्यावर उतरले
बिहारमधील सत्तारूढ संजदमधील खुर्चीची लढाई आता रस्त्यावर आली आहे. मुख्यमंत्री जीतनराम मांझी आणि माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या समर्थकांमध्ये शुक्रवारी संघर्ष उडाला. यावेळी मांझी यांच्या समर्थकांनी नितीशकुमार समर्थकांना झोडपून काढले.
पाटणा येथील पक्ष मुख्यालयाबाहेर गोळा झालेल्या मांझी समथरकांनी नितीशकुमार यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नितीश समर्थकही तेथे आले आणि त्यांनी मांझीविरुद्ध घोषणा दिल्या. यावेळी मांझी समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी नितीश समर्थकांना झोडपले.
बॉक्स
अनेक मंत्री मांझींच्या पाठीशी
बिहारचे कृषिमंत्री नरेंद्र सिंग ,मनुष्यबळ विकास मंत्री ब्रजेश पटेल, ग्रामविकास मंत्री नितीश मिश्रा हे दोघेही शरद यादव यांनी बोलविलेल्या बैठकीत अनुपस्थित राहणार आहेत़ महाचंद्र प्रसाद सिंह, सम्राट चौधरी आदी मंत्र्यांनीही मांझी यांना पाठिंबा दर्शवला आहे़ जदयूचे बंडखोर आमदार ज्ञानेंद्र सिंह ज्ञानू, रवींद्र राय हेही मांझी यांच्या पाठीशी आहेत़
. एका ‘महादलित’ मुख्यमंत्र्याला पदावरून हटविणे हे सत्तारूढ संजदसाठी आत्मघातकी आणि बिहारच्या जनतेचा विश्वासघात ठरेल, असे नरेंद्र सिंग यांनी म्हटले आहे.
भाजपची ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका...!
बिहार सरकारमधील या अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपने ‘वेट अॅण्ड वॉच’ची भमिका घेतली आहे़ आम्ही स्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि योग्य वेळ येताच निर्णय घेऊ़ भाजपसाठी सर्व पर्याय खुले आहेत, असे भाजपचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार मोदी म्हणाले़ मांझी यांना त्यांच्या पक्षाने बडतर्फ केल्यास भाजप त्यांना पाठिंबा देणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता़