नितीशकुमार यांच्या संजदला मुख्य विरोधी पक्षाचा दर्जा

By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:30+5:302015-02-20T01:10:30+5:30

बिहारमधील राजकीय संघर्ष : मांझींची आज शक्तिपरीक्षा

Nitish Kumar's Sanjad's main opposition party status | नितीशकुमार यांच्या संजदला मुख्य विरोधी पक्षाचा दर्जा

नितीशकुमार यांच्या संजदला मुख्य विरोधी पक्षाचा दर्जा

हारमधील राजकीय संघर्ष : मांझींची आज शक्तिपरीक्षा
पाटणा : बिहारमधील अत्यंत वेगवान राजकीय घडामोडीत मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव सादर करण्यापूर्वीच विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनी गुरुवारी भाजपच्या जागी संयुक्त जनता दलाला (संजद) मुख्य विरोधी पक्षाचा दर्जा दिला. दरम्यान, राज्यातील सत्ता संघर्ष निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, आज शुक्रवारी मांझी यांना शक्तिपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, भाजपने या निर्णयावर टीका करताना ही मनमानी असल्याचे म्हटले आहे.
विधानसभा अध्यक्षांनी भाजप नेते नंदकिशोर यादव यांच्या स्थानी संजद नेते विजय चौधरी यांना विरोधी पक्षनेतेपद दिले आहे. चौधरी यांनी आपल्या या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, विधानसभा सचिवालयाला संख्याबळाच्या आधारे काम करावे लागते. संजदने मुख्य विरोधी पक्षाचा दर्जा देण्याची मागणी केली होती आणि संख्याबळाचा विचार करता त्यांना हा दर्जा नाकारता येणार नाही.
संजदचे अध्यक्ष शरद यादव यांनी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर त्यांना विधानसभेत असंलग्न सदस्य जाहीर करण्यात आले आहे.
संजदला विधान परिषदेतही मुख्य विरोधी पक्षाचा दर्जा मिळाला आहे. सभापती अवधेश नारायण सिंग यांनी याबाबत माहिती देताना संजदला विरोधी पक्ष जाहीर करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता असे सांगितले. संजद विधिमंडळ पक्षाचे नेते विजय चौधरी यांनी बुधवारी सर्वपक्षीय बैठकीत विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षांच्या आसनांवर बसण्याची परवानगी मागितली होती. कारण या पक्षाने मांझी यांच्या विश्वासदर्शक ठरावाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपचे धरणे
दरम्यान, या निर्णयाने नाराज झालेल्या भाजप सदस्यांनी विरोधात नारेबाजी करीत विधानसभेच्या प्रवेशद्वारासमोरच धरणे दिले. (वृत्तसंस्था)
-------
एकच पक्ष (संजद) सत्तापक्षात आणि विरोधात बसण्याचा हा देशातील बहुधा पहिलाच प्रसंग आहे. मांझी यांना मुद्यांवर आधारित समर्थन देण्याची तयारी भाजपने दर्शविली होती; परंतु याचा अर्थ पक्ष मांझी सरकारमध्ये सहभागी होणार होता असे नाही.
-नंदकिशोर यादव,
भाजप नेते
-----------
संयुक्त जनता दलाला नियमांनुसार मुख्य विरोधी पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. सभागृहाचे कामकाज हे नियम आणि कायद्यानुसार चालत असते, कोणा एकाच्या मर्जीने नाही.
-उदय नारायण चौधरी,
विधानसभा अध्यक्ष
----------
सभागृहाचे संख्याबळ
२४३ सदस्यीय बिहार विधानसभेत विद्यमान सदस्य संख्या २३३ आहे.
यात तूर्तास संजदकडे विधानसभा अध्यक्षांसह ११०, मांझीच्या रूपात एक असंलग्न सदस्य, भाजप ८७, राजद २४, काँग्रेस ५, भाकपा १, अपक्ष ५ सदस्य आहेत. १० जागा रिक्त आहेत.
----------
संजदने केला आमदारांच्या घोडेबाजाराचा आरोप
अल्पमतात आलेले जितन राम मांझी सरकारने आपल्या अस्तित्वाच्या बचावासाठी आमदारांचा घोडेबाजार सुरू केला असल्याचा आरोप संयुक्त जनता दलाने केला आहे. तातडीने बोलाविण्यात आलेल्या एका पत्रपरिषदेत या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंग यांनी शिवहरचे आमदार शरफुद्दीन यांना हजर केले. मधुपुराचे राजदचे खासदार पप्पू यादव यांनी आपल्याला दूरध्वनी करून शक्तिपरीक्षादरम्यान मांझींना पाठिंबा दिल्यास पैसा आणि मंत्रिपदाचा प्रस्ताव दिला, असा दावा शरमुद्दीन यांनी केला. दरम्यान, पप्पू यादव यांनी या आरोपाचे खंडन केले असून या प्रकरणी कुठल्याही चौकशीची तयारी दर्शविली आहे. शरफुद्दीन यांना आपण ओळखतही नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Nitish Kumar's Sanjad's main opposition party status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.