Nitish Kumar vs Tejashwi Yadav, Bihar Politics: बिहार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सभागृहाचे कामकाज सुरू झाले, तेव्हा वातावरण चांगलेच तापले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच तेजस्वी यादव यांनी SIRच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तेजस्वी यादव यांच्या मागणीनुसार, विधानसभा अध्यक्ष नंद किशोर यादव यांनीही सर्व पक्षांना या मुद्द्यावर त्यांचे मत मांडण्यासाठी वेळ दिला होता. पण राजद आमदाराच्या विधानानंतर सभागृह तहकूब करण्यात आले.
"सभागृह कुणाच्याही बापाचं नाही"
तेजस्वी यादव यांनी सभागृहात बोलायला सुरुवात केली, तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या काही सदस्यांनी गोंधळ सुरू केला. यावर राजद आमदार भाई वीरेंद्र म्हणाले की, 'सभागृह कोणाच्याही बापाचे नाही. विरोधकांनाही येथे आपले विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.' भाई वीरेंद्र यांच्या या विधानानंतर सभागृहाचे वातावरण पूर्णपणे तापले. यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे सदस्य एकमेकांशी भिडले. संपूर्ण सभागृहात जोरदार वाद आणि आरडाओरडा सुरू झाली. या सगळ्यानंतर सभागृहाचे वातावरण इतके बिघडले की विधानसभा अध्यक्ष नंद किशोर यादव यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. या दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी भाई वीरेंद्र यांना माफी मागण्यास सांगितले.
मुख्यमंत्री नितीश यांचे विकासाचे भाषण
तेजस्वी यांनी संवाद सुरू केला, तेव्हा पहिल्यांदाच मुख्यमंत्री नितीश कुमार मध्यभागी उभे राहिले आणि त्यांनी बिहारसाठी काय काम केले आहे हे सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले, "२००५ पूर्वी बिहारमध्ये कोणत्या प्रकारची व्यवस्था होती? आम्ही पाहिले आहे. लोक संध्याकाळी ५ नंतर घराबाहेर पडत नव्हते. अराजकतेचे वातावरण होते. तुम्ही तेव्हा लहान होतात. तुमच्या आई-वडीलांची सत्ता असताना येथे काय घडायचे हे तुम्हाला कसे कळणार? आम्ही कसे काम केले आणि बिहारला योग्य मार्गावर आणले, ते आम्हालाच माहिती आहे," असे बिहारचे मुख्यमंत्री म्हणाले.
"जनता सांगेल की कोणी काय केले?"
"आम्हाला जनतेने दोनदा संधी दिली, पण तरीही तुम्ही लोक तेच करत राहिलात. मग आम्ही बिहारच्या विकासासाठी काम करू लागलो. बिहारची आता काय स्थिती आहे? हे सर्वांसमोर आहे. येत्या काही दिवसांत निवडणुका होणार आहेत आणि सर्वांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यावेळी जनता सांगेल की कोणी काय केले?" असे नितीश कुमार यांनी ठणकावले.