बिहारमधील सत्तासंघर्ष चिघळला, नितीशकुमार विधीमंडळ नेतेपदी
By Admin | Updated: February 7, 2015 17:47 IST2015-02-07T17:36:17+5:302015-02-07T17:47:55+5:30
विद्यमान मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी विधानसभा भंग करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तर दुसरीकडे नितीशकुमार यांची जदयूच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

बिहारमधील सत्तासंघर्ष चिघळला, नितीशकुमार विधीमंडळ नेतेपदी
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ७ - बिहारमधील जनता दल संयुक्तमधील सत्तासंघर्ष शनिवारी आणखी चिघळला असून विद्यमान मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी विधानसभा भंग करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तर दुसरीकडे नितीशकुमार यांची जदयूच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली असून नितीशकुमार समर्थक २१ मंत्र्यांनी मांझी यांचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
बिहारमधील मुख्यमंत्रीपदावरुन जदयूमधील अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचला आहे. विद्यमान मुख्यमंत्री जितनराम मांझी यांची उचलबांगडी करुन नितीशकुमार यांची मुख्यमंत्रीपदावर वर्णी लावण्याची तयारी जदयूच्या वरिष्ठ नेत्यांनी केली होती. मात्र मांझी या पदावरुन हटण्यास तयार नाही. शनिवारी मांझी आणि नितीशकुमार यांच्यात बैठकही झाली. मात्र बैठकीत अनुकूल तोडगा निघू शकला नाही. यानंतर मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेत विधानसभा भंग प्रस्ताव करण्याचा प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला जाणार आहे. या प्रस्तावाला नितीशकुमार समर्थक २१ मंत्र्यांनी विरोध दर्शवला तर पाच मंत्र्यांनी मांझीच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला.
मांझीनी विधानसभा भंग करण्याचा प्रस्ताव सादर केला असतानाच जदयूच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत आमदारांनी बहुमताने नितीश कुमार यांची विधीमंडळ नेतेपदी निवड झाली. या निवडीमुळे नितीशकुमार यांचा मुख्यमंत्रीपदावर परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा बरखास्त करण्याचा अंतिम निर्णय मांझी यांचाच असेल अशी माहिती बिहार सरकारच्यावतीने देण्यात आली आहे. त्यामुळे आता बिहारमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.