NISAR Satellite Launch: भारताची अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच ISRO ने आज(३० जुलै २०२५) एक ऐतिहासिक लॉन्चिंग केली आहे. भारत आणि अमेरिकेच्या भागीदारीत तयार झालेले NISAR (नासा-इस्रो सिंथेटिक एपर्चर रडार) सॅटेलाईट ५:४० वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. या सॅटेलाईटला पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर म्हणून ओळखले जाते.
हे उपग्रह भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींची आधीच माहिती देण्यास सक्षम आहे. हे जगातील पहिले असे सॅटेलाईट आहे, जे दोन रडार फ्रिक्वेन्सी (एल-बँड आणि एस-बँड) चा वापर करुन पृथ्वीच्या पृष्ठभाग स्कॅन करेल.
निसार मिशन काय आहे?
निसार हे लो अर्थ ऑर्बिट (LEO) सॅटेलाईट आहे, जे नासा आणि इस्रोने संयुक्तपणे बनवले आहे. हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर, बर्फ आणि जंगलांचे स्कॅन करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. याला "पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर" असेही म्हटले जाते. याचे कारण म्हणजे, हे सॅटेलाईट पृथ्वीच्या पृष्ठभागाचे इतके बारीक फोटो काढू शकतो, ज्याद्वारे पृथ्वीवर होणारे अतिशय छोटे बदलही पाहता येतात.
हे सॅटेलाईट दर १२ दिवसांनी संपूर्ण पृथ्वी स्कॅन करेल आणि भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा इशारा देईल. या मिशनवर तब्बल १३,००० कोटी रुपये (१.५ अब्ज डॉलर्स) खर्च झाले आहेत. यात इस्रोचे योगदान ७८८ कोटी रुपये आहे. या सॅटेलाईटचा डेटा जगभरातील शास्त्रज्ञ, सरकार आणि सामान्य लोकांना मोफत उपलब्ध असेल.
नैसर्गिक आपत्तींची आधीच माहिती मिळणार
भूकंप आणि ज्वालामुखी: निसार भूपृष्ठाच्या सर्वात लहान हालचाली मोजू शकतो. भूकंपापूर्वी फॉल्ट लाईन्स (पृथ्वीवरील भेगा) मधील हालचाली टिपू शकतो. याच्या मदतीने भूकंपाचा धोका असलेल्या ठिकाणांची माहिती मिळेल. शिवाय, हे ज्वालामुखींभोवती जमिनीचे स्कॅनिंग करेल, जेणेकरुन उद्रेकापूर्वीच माहिती मिळेल.
त्सुनामी: त्सुनामी इशारा देण्यासाठी भूकंपांची अचूक माहिती आवश्यक आहे. NISAR भूकंपाच्या आधी आणि नंतर जमिनीच्या हालचालींचा डेटा प्रदान करेल, ज्यामुळे त्सुनामीचा अंदाज लावण्यास मदत होईल.
भूस्खलन: NISAR पर्वतीय भागात माती आणि खडकांची हालचाल कॅप्चर करू शकते, ज्यामुळे भूस्खलनाचा धोका आधीच जाणून घेण्यास मदत होऊ शकते. भारतासारख्या देशांसाठी हे खूप महत्वाचे आहे.
पूर आणि वादळे: NISAR मातीतील ओलावा आणि नद्या आणि तलावांच्या पाण्याची पातळी मोजू शकते. हे पूरसदृष्ट परिस्थितीत पाण्याच्या प्रसाराचा मागोवा घेईल. शिवाय, वादळांच्या प्रभावाचे देखील निरीक्षण करेल.
पायाभूत सुविधांचे निरीक्षण: NISAR धरणे, पूल आणि इतर संरचनांच्या सभोवतालच्या जमिनीच्या हालचाली मोजून त्यांची स्थिरता मोजेल. यामुळे संरचना कोसळण्याचा धोका आधीच जाणून घेण्यास मदत होऊ शकते.
NISAR चे इतर फायदे
हवामान बदलाचे निरीक्षण: NISAR बर्फाचे थर, हिमनद्या आणि समुद्रातील बर्फ वितळण्याचे निरीक्षण करेल. समुद्राची वाढती पातळी आणि हवामान बदलाचा परिणाम समजून घेण्यास मदत होईल.
शेती आणि वने: हे पिकांची स्थिती, जंगलातील जैवविविधता आणि जंगलतोड यांचे निरीक्षण करेल. यामुळे भारतासारख्या शेतीप्रधान देशांमध्ये पीक व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षेत मदत होईल.
जलसंपत्ती व्यवस्थापन: मातीतील ओलावा आणि भूजलाची पातळी मोजून, ते जलसंपत्तीचे चांगले व्यवस्थापन करण्यास मदत करेल. हे विशेषतः आसाम आणि केरळ सारख्या पूरग्रस्त राज्यांसाठी उपयुक्त आहे.
किनारी देखरेख: किनारी धूप, समुद्रातील बर्फ आणि तेल गळतीचा मागोवा घेऊन, ते सागरी पर्यावरणाचे संरक्षण करण्यास मदत करेल.
जागतिक सहकार्य: NISAR हे भारत आणि अमेरिकेतील 10 वर्षांच्या वैज्ञानिक सहकार्याचे प्रतीक आहे. त्याचा डेटा जगभरातील देशांना, विशेषतः विकसनशील देशांना मोफत उपलब्ध असेल, ज्यामुळे त्यांचे आपत्ती व्यवस्थापन आणि हवामान नियोजन सुधारेल.