निर्भया प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगार सुटला, इंडिया गेटवर निदर्शने
By Admin | Updated: December 20, 2015 18:36 IST2015-12-20T18:16:48+5:302015-12-20T18:36:44+5:30
प्रखर विरोधानंतरही अखेर निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन दोषीची रविवारी संध्याकाळी सुधारगृहातून सुटका झाली.

निर्भया प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगार सुटला, इंडिया गेटवर निदर्शने
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - प्रखर विरोधानंतरही अखेर निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन दोषीची रविवारी संध्याकाळी सुधारगृहातून सुटका झाली. या आरोपीच्या सुटकेविरोधात इंडिया गेट येथे विरोध प्रदर्शन सुरु आहे. निर्भयाचे आई-वडिल या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. आंदोलनाला हिंसक वळण लागू नये यासाठी इंडिया गेट परिसराला युध्दछावणीचे रुप आले आहे. निर्भयाच्या आई-वडिलांनी दोषीच्या सुटकेसाठी केंद्र आणि राज्य सरकारला जबाबदार धरले आहे.
दोषीची सुटका करण्यापेक्षा त्याला फासावर लटकवा अशी मागणी आंदोलक करत आहेत. १६ डिसेंबर २०१२ च्या रात्री सहा नराधमांनी मिळून दिल्लीत धावत्या बसमध्ये निर्भयावर सामूहिक बलात्कार केला होता. त्यात हा अल्पवयीन आरोपी होता. त्यावेळी वयाची १८ वर्ष पूर्ण झाली नसल्याने त्याच्यावर अल्पवयीन कायद्यातंर्गत खटला चालला. त्यामुळे तीनवर्षानंतर आज त्याची सुटका झाली.
या दोषीची सुटका होऊ नये अशी सर्वच स्तरातून मागणी होत होती. पण कायद्यानुसार आधी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यानंतर शनिवारी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयाने दोषीच्या सुटकेला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे रविवारी संध्याकाळी या दोषीची सुटका झाली. हा गुन्हेगार सुटला असला तरी, त्याला एका स्वयंसेवी संस्थेच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.