Nimisha Priya Case Updates : येमेनच्या तुरुंगात असलेली भारतीय नर्स निमिषा प्रियाची १६ जुलै रोजी होणारी फाशी पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच तिच्या माफीच्या अर्जावरही चर्चा सुरू झाली आहे. केरळचे ग्रँड मुफ्ती शेख कंठापुरम एपी अबू बकर मुसलियार यांच्या हस्तक्षेपामुळे हे घडले आहे. येमेनमध्ये भारताचा दूतावास नाही आणि भारत तेथील हुथी सरकारला मान्यता देत नाही. अशा परिस्थितीत, निमिषा प्रिया प्रकरणात भारताच्या ग्रँड मुफ्तींनी पीडिता आणि सरकारशी चर्चा कशी सुरू केली हे जाणून घेऊया.
शेख हबीबचे भारतातील ग्रँड मुफ्ती अबू बकर यांच्याशी चांगले संबंध
ग्रँड मुफ्ती शेख कंठापुरम एपी अबू बकर मुसलियार यांनी या मुद्द्यावर येमेनचे शेख हबीब उमर बिन हाफिज यांच्याशी संपर्क साधला होता. शेख हबीब यांनी येमेनमधील अधिकाऱ्यांशी आणि निमिषा प्रियाने मारलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांशी चर्चा सुरू केली आहे. शेख हबीब हे येमेनचे प्रसिद्ध धर्मगुरू आहेत आणि सूफी पंथातील बा अलावी तारिकाच्या प्रमुख व्यक्तींपैकी एक आहेत. हबीब उमर हे येमेनमधील तारिम येथील 'दार अल-मुस्तफा' या धार्मिक संस्थेचे संस्थापक आहेत. येमेनमध्ये युद्ध सुरू होण्यापूर्वी केरळमधील अनेक लोकांनी या संस्थेतून शिक्षण घेतले होते. त्यामुळे शेख हबीबचे भारतातील ग्रँड मुफ्ती अबू बकर यांच्याशी चांगले संबंध आहेत.
२००७ मध्ये झालेला भारत दौरा
जॉर्डनच्या रॉयल इस्लामिक स्ट्रॅटेजिक स्टडीज सेंटर आणि अमेरिकेच्या जॉर्जटाऊन विद्यापीठाने तयार केलेल्या ५०० सर्वात प्रभावशाली मुस्लिमांच्या यादीत भारताचे ग्रँड मुफ्ती अबू बकर यांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत शेख हबीब यांचाही समावेश आहे. शेख हबीब यांनीही भारताला भेट दिली होती. ते मलप्पुरममधील नॉलेज सिटीमधील मशीद आणि मदीना सदाथ अकादमीच्या उद्घाटनानिमित्त २००७ मध्ये केरळमध्ये आले होते.
हबीब उमर यांचा देशात नावलौकिक
हबीब उमर बिन हाफिज हे येमेनी सुन्नी आणि सूफी इस्लामिक जाणकार, शिक्षक आणि दार अल-मुस्तफा इस्लामिक मदरशाचे संस्थापक आणि डीन आहेत. ते अबू धाबीमधील तबाह फाउंडेशनच्या सर्वोच्च सल्लागार परिषदेचे सदस्य देखील आहेत. त्यांनी २००७ मध्ये 'अ कॉमन वर्ड बिटवीन अस अँड यू' नावाचे एक व्यासपीठ स्थापन केले, जे मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्यात समन्वय साधण्यासाठी काम करते. त्यांचे विद्यार्थी म्हणतात की काही अतिरेकी गट वगळता येमेनमधील समाजाच्या सर्व घटकांमध्ये त्यांचा आदर केला जातो.