रात्रनिवाऱ्यात घुसली कार; पाच मजूर ठार
By Admin | Updated: January 9, 2017 01:39 IST2017-01-09T01:39:52+5:302017-01-09T01:39:52+5:30
दिवसवर काबाडकष्ट करून रात्रनिवाऱ्यात उद्याची स्वप्न रंगवत झोपी गेलेल्या पाच मजुरांसाठी शनिवारची उत्तररात्र काळरात्र ठरली.

रात्रनिवाऱ्यात घुसली कार; पाच मजूर ठार
लखनौ : दिवसवर काबाडकष्ट करून रात्रनिवाऱ्यात उद्याची स्वप्न रंगवत झोपी गेलेल्या पाच मजुरांसाठी शनिवारची उत्तररात्र काळरात्र ठरली. हजरतगंज पसिरातील डालीबागस्थित रात्र निवाऱ्यात घुसलेल्या भरधाव कारखाली पाच मजूर चिरडून ठार झाले. कारमधील दोघेही दारूच्या नशेत तर्रर्र होते. यापैकी एकाचे नाव आयुष कुमार रावत असून तो समाजवादी पार्टीच्या एका माजी आमदाराचा मुलगा आहे. दुसऱ्याचे नाव निखिल अरोरा आहे. या दोघांनाही अटक करण्यात आली.
या रात्रनिवाऱ्यात ३५ मजूर झोपले होते. शनिवारची मध्यरात्र उलटल्यानंतर रात्री दोन वाजता ही भयंकर शोकांतिका घडली. रात्रनिवाऱ्यात घुसलेल्या भरधाव कारखाली पाच जण चिरडले गेले. पैकी चौघे जागीच ठार झाले, तर अन्य एका मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही कार जप्त करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मंजिल सैनी यांनी सांगितले. या रात्रनिवाऱ्यात दररोज दाटीवाटीने पन्नासहून अधिक निराधार लोक आश्रय घेतात. (वृत्तसंस्था)