नवी दिल्ली - साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना दिलासा मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाच्या उमेदवारीला स्थगिती देणे हे कोर्टाचे काम नसून ते निवडणूक आयोगाचे काम आहे. आरोपींना निवडणूक लढण्यापासून न्यायालय रोखू शकत नाही असं विशेष न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
विशेष एनआयए कोर्टाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारी आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. या याचिकेच्या बाजूने वकीलांनी सांगितलं की, प्रज्ञा सिंह यांची तब्येत खराब असल्याने कोर्टाच्या कार्यवाहीत त्या सहभागी होत नाही मात्र निवडणुकीच्या प्रचाराला प्रज्ञा सिंह ठाकूर पूर्णपणे उतरल्या असून त्यांची तब्येत बरी नाही असं कुठेही दिसत नसल्याचा आक्षेप घेण्यात आला. मात्र एनआयए कोर्टाने ही याचिका फेटाळत लावत निवडणुकीत कोणत्या उमेदवारीला विरोध करणं कोर्टाचं काम नसल्याचं बजावलं आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भोपाळ मतदार संघासाठी भाजपाकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देण्यात येऊ नये अशी याचिका कोर्टात करण्यात आली होती. मालेगाव बॉम्ब स्फोटातील पीडिताच्या वडिलांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उमेदवारी मिळण्यापूर्वी तब्येतीचे कारण पुढे करत एनआयए कोर्टाकडून जामीन मिळवला आहे. त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती. नासीर अहमद सय्यद बिलाल यांनी ही याचिका दाखल केली होती.
दरम्यान, मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे भोपाळ लोकसभा मतदारसंघातून साध्वी यांनी उमेदवारी देऊन भाजपाने हिंदू मतांना जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र साध्वी यांना उमेदवारी मिळाल्यानंतर अनेकांनी भाजपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल साध्वी यांनी केलेलं वादग्रस्त विधानामुळे भाजपाविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली. त्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलेलं विधान मागे घेतलं. एकंदरीतच साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या उमेदवारीमुळे चर्चेत आलेल्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार हे 23 मेच्या निकालानंतर स्पष्ट होईल.