नवी दिल्ली - दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाचा जलद तपास सुरू आहे. या स्फोटाचा तपास करण्याची जबाबदारी NIA सोपवण्यात आली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतान येथून दिल्लीतील या घटनेमागे असणाऱ्या षडयंत्रकर्त्यांना सोडणार नाही असा इशारा दिला आहे. या स्फोटातील सर्व धागेदोरे तपास यंत्रणा शोधून काढत आहे. त्यात उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे तपास यंत्रणेने डॉ. परवेज आणि डॉ. शाहीन यांच्या घरावर धाड टाकली. हे दोघेही भाऊ बहीण आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव सईद अंसारी आहे. त्यांनी आपली मुले दहशतवादी कारवायात सहभागी आहेत हे आरोप फेटाळले आहेत.
डॉ. शाहीनच्या वडिलांचे विधान समोर आले आहे. ते म्हणतात की, मला ३ मुले आहेत. मोठा मुलगा शोएब तो माझ्यासोबत राहतो. दुसरी शाहीन, ज्याचा उल्लेख सगळे करतायेत, मला विश्वास बसत नाही, ती या चुकीच्या कारवायांमध्ये सहभागी असेल. मी एक महिन्यापूर्वीच शाहीनशी बोललो होतो. परवेजसोबतही याच आठवड्यात बोलणे झाले होते असं त्यांनी सांगितले. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ सोमवारी भीषण स्फोट घडला आणि त्याआधी फरीदाबाद येथून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली त्यामुळे देशभरात सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. मंगळवारी उत्तर प्रदेश एटीएस आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त टीमने लखनौ येथील इंटीग्रल यूनिवर्सिटीशी निगडीत डॉक्टर परवेज अंसारी याच्या घरावर धाड टाकली होती.
माहितीनुसार, डॉ. परवेजचा संबंध फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी जोडलेली डॉ. शाहीन शाहीद आणि डॉ. मुझम्मिल अहमदशी आहे. डॉ. शाहीन आणि डॉ. परवेज हे दोघे भाऊ बहीण असल्याचं समोर आल्यानंतर तपासात ट्विस्ट आला. एटीएस आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या टीमने सकाळी ७ वाजता मुत्तकीपूर परिसरात डॉ. परवेजचे घर गाठले. या घराभोवती कडेकोट सुरक्षेचा घेराव करत टीमने आत प्रवेश केला आणि शोध चालू ठेवला. यावेळी स्थानिक टीमही तिथे हजर होती. या कारवाईवेळी डॉ. परवेज घरात नव्हता. टीमने घरातील इतर सदस्यांशी चौकशी केली, त्यात महत्त्वाचे कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे हाती लागले.
एटीएसने घराबाहेर असलेली सफेद रंगाची अल्टो कार आणि आतून स्प्लेंडर बाइक जप्त केली. कारच्या काचेवर इंटिग्रल यूनिवर्सिटीचा गेट पास होता. घरातून काही अन्य उपकरणे, मोबाईल फोन, लॅपटॉप सापडले. तपास करणाऱ्या पथकाने आसपासही चौकशी केली, तेव्हा डॉ. परवेज जास्त मिळून मिसळून नव्हते, ते घरातही कमी वेळा असायचे असं सांगितले. एटीएसने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात काही संशयास्पद आढळले नाही. डॉ. परवेज प्रोफेसर म्हणून काम करत होते की अन्य काही त्यांची भूमिका होती याचा तपास सुरू आहे.
हे संपूर्ण प्रकरण फरीदाबादमध्ये उघडकीस आलेल्या दहशतवादी मॉड्यूलशी जोडलेले असल्याचे म्हटले जाते. ३० ऑक्टोबर रोजी स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) ने फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठातील एमबीबीएस विद्यार्थी डॉ. मुझम्मिल अहमदला अटक केली. त्याच्या भाड्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटके, एके-४७ रायफल आणि अनेक मासिके जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान मुझम्मिलने त्याची मैत्रीण डॉ. शाहीन शाहिद हिचे नाव सांगितले, जिला नंतर अटक करण्यात आली. शाहीनच्या गाडीच्या ट्रंकमधून शस्त्रे जप्त करण्यात आली. शाहीनचे लखनऊशी जुने संबंध होते. तिचे आजी-आजोबा लालबाग परिसरात राहत होते. याच तपासात डॉ. परवेजचं नाव समोर आले, जो कथितपणे या नेटवर्कच्या संपर्कात होता.
कोण आहे डॉ. शाहीन?
डॉ. शाहीन हिच्याबद्दलही मोठे दावे केले जात आहेत. डॉ. शाहीन ही दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या महिला विंगची प्रमुख असल्याचा दावा केला जात आहे. शाहीनची लोकसेवा आयोगामार्फत निवड झाली आणि ती कानपूरमधील गणेश शंकर विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक झाली. त्यानंतर २०१३ मध्ये ती कोणालाही न कळवता महाविद्यालयातून गायब झाली. डॉ. शाहीनचे लग्न जफर हयात नावाच्या व्यक्तीशी झाले होते. २०१५ मध्ये शाहीनचा घटस्फोट झाला. २०२१ मध्ये संस्थेने डॉ. शाहीनला काढून टाकले. तीदेखील सध्या फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठाशी संबंधित होती.
Web Summary : Delhi blast investigation reveals doctor siblings, Shaheen and Parvez, under suspicion. Raids uncover potential terror links. Shaheen allegedly connected to Jaish-e-Mohammed's women's wing.
Web Summary : दिल्ली विस्फोट जांच में डॉक्टर शाहीन और परवेज संदिग्ध। छापे में संभावित आतंकी संबंध उजागर। शाहीन कथित तौर पर जैश-ए-मोहम्मद की महिला विंग से जुड़ी है।