काँग्रेसकडून राष्ट्रवादीला १२४ जागांचा नवा प्रस्ताव
By Admin | Updated: September 22, 2014 08:36 IST2014-09-22T03:29:55+5:302014-09-22T08:36:06+5:30
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांनी नव्याने जागांच्या वाटाघाटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना नवा फॉर्म्युला देणारे संदेश पाठवले

काँग्रेसकडून राष्ट्रवादीला १२४ जागांचा नवा प्रस्ताव
नबीन सिन्हा, नवी दिल्ली
समान जागांवर अडून बसलेल्या राष्ट्रवादीला रविवारी काँग्रेसने नवा प्रस्ताव देत १२४ जागा देण्याची तयारी दर्शविली आहे, मात्र समाधान न झालेल्या राष्ट्रवादीने हा प्रस्ताव मान्य केला नसल्याने जागावाटपाचे त्रांगडे कायम आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांनी नव्याने जागांच्या वाटाघाटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना नवा फॉर्म्युला देणारे संदेश पाठवले आहेत. आघाडी वाचविण्याचा भाग म्हणून काँग्रेसने पूर्वीपेक्षा दहा जागा जास्त देण्याची तयारी दर्शविली. याआधी केवळ ११४ जागा देऊ केल्या होत्या. दोन्ही पक्षांनी १९९९ पासून महाराष्ट्रात आघाडीचे सरकार चालविले असून दोन निवडणुका एकत्र लढल्या आहेत.
राष्ट्रवादीचे नेते सोमवारी किंवा मंगळवारी दिल्लीत येतील, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. आॅगस्टमध्ये अखेरची बैठक झाली तेव्हा सोनिया गांधी आणि पवार यांनी एकत्रित निवडणूक लढण्याला मान्यता दिली होती. जागांच्या वाटाघाटीचा मुद्दा प्रदेश नेत्यांवर किंवा समन्वय समितीवर सोपविला होता; मात्र ही समिती कधीही समोर आली नाही. समान जागांसाठी मोहीम उघडणारे प्रफुल्ल पटेल यांनी १२४ जागांचा प्रस्ताव फेटाळला आहे. गेल्यावेळी राष्ट्रवादीने ११४ जागा लढविल्या होत्या. काँग्रेसची तेवढ्याच जागा देण्याची यंदा तयारी होती. काँग्रेसच्या निवडणूक समितीने उमेदवारांची निवड करण्याची प्रक्रिया चालवितानाच राष्ट्रवादीला कठोर संदेश दिला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अल्टिमेटम देत आघाडी स्थापण्यात अपयश आल्यास स्वतंत्र लढण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. शरद पवारांनी आतापर्यंत मौन पाळले आहे.