विरोधी पक्षनेतेपद वादाला नवे वळण
By Admin | Updated: June 17, 2014 00:15 IST2014-06-17T00:15:31+5:302014-06-17T00:15:31+5:30
लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्यावरून माकपा काँग्रेसच्या पाठीशी उभा झाला आहे आणि हे पद काँग्रेसला देण्याची मागणी या पक्षाने केली आहे

विरोधी पक्षनेतेपद वादाला नवे वळण
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्यावरून माकपा काँग्रेसच्या पाठीशी उभा झाला आहे आणि हे पद काँग्रेसला देण्याची मागणी या पक्षाने केली आहे. काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद देण्याचा निर्णय दीर्घ काळ चालत आलेल्या परंपरेला शोभणारा राहील आणि त्यामुळे लोकशाही मूल्यांचेही जतन केले जाईल, असे मत माकपा नेते आणि राज्यसभा सदस्य सीताराम येचुरी यांनी व्यक्त केले आहे.
येचुरी म्हणाले, राज्यसभेतील कायदा अगदी स्पष्ट आहे आणि सर्वांत मोठ्या पक्षाला विरोधी पक्ष मानण्याची परंपरा आहे. पाच पेक्षा कमी सदस्यसंख्या असलेल्या कोणत्याही पक्षाला गट म्हणून तर पाच पेक्षा जास्त संख्या असलेल्या पक्षाला पक्ष म्हणून मान्यता दिली जाते आणि सर्वात मोठा पक्ष असलेल्या पक्षाला विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळते. तथापि लोकसभेतील परंपरा आणि प्रक्रिया निराळी आहे. परंतु असे असले तरी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद द्यायला पाहिजे. हा मुद्दा सोडविला पाहिजे. ही काळाची गरज आहे.
विरोधी पक्षनेत्याची व्याख्या करणारा स्पष्ट असा कायदा नाही. परंतु लोकसभा अध्यक्षाला त्याची व्याख्या करण्याचा अधिकार आहे, असे येचुरी म्हणाले. लोकसभेचे विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसला देण्यात यावे, अशी मागणी संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी केल्यानंतर लगेच येचुरी यांचे हे वक्तव्य पुढे आले आहे. लोकसभेत काँग्रेसचे ४४ खासदार आहेत. विरोधी पक्ष नेतेपद मिळविण्यासाठी एकूण सदस्यसंख्येच्या दहा टक्के सदस्य असणे आवश्यक आहे. ही संख्या ५४ होते. याआधी ५४ पेक्षा कमी सदस्य असलेल्या कोणत्याही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळालेले नाही.