चार पायांच्या बाळाला मिळालं नवीन आयुष्य
By Admin | Updated: February 10, 2017 11:48 IST2017-02-10T11:25:58+5:302017-02-10T11:48:22+5:30
चार पायांसहीत जन्मलेल्या बाळावर सिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे.

चार पायांच्या बाळाला मिळालं नवीन आयुष्य
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 10 - चार पायांसहीत जन्मलेल्या बाळावर सिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. यामुळे एक प्रकार या बाळाचा पुर्नजन्मच झाला आहे. आता डॉक्टर टेलिमेडिसिनच्या माध्यमातून बाळावर नजर ठेऊन असणार आहेत.
रायचूरमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुलादिनी गावात राहणा-या एका महिलेने या बाळाला जन्म दिला. जन्मलेल्या बाळाला एकूण चार पाय असल्याने त्याला बेल्लारीमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सर्वसामान्य आयुष्य जगता यावे यासाठी बाळावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी या दाम्पत्याला दिला.
मात्र शस्त्रक्रियेचा खर्च परवडण्यासारखा नसल्याने त्याच्या पालकांनी नकार दिला. दरम्यान, बंगळुरूतील नारायणा हेल्थ सिटी सेंटर या मुलाच्या मदतीसाठी धावून आले. या संस्थेने मुलाच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतल्यानंतर पालकांनी शस्त्रक्रियेसाठी सहमती दर्शवली.
यानंतर तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या या शस्त्रक्रियेत मुलाचे जास्तीचे दोन पाय काढण्यात आले. आता बाळाची प्रकृती स्थिर असून त्याला डॉक्टरांच्या देखरेखखाली ठेवण्यात आले आहे.