अलकायदाचा नवीन प्रमुख भारतीय ?
By Admin | Updated: October 3, 2014 17:46 IST2014-10-03T17:46:42+5:302014-10-03T17:46:42+5:30
अलकायदा या दहशतवादी संघटनेच्या भारतीय उपखंडातील युनिटचा प्रमुख हा भारतातील उत्तरप्रदेशचा माजी रहिवासी असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.

अलकायदाचा नवीन प्रमुख भारतीय ?
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - अलकायदा या दहशतवादी संघटनेच्या भारतीय उपखंडातील युनिटचा प्रमुख हा भारतातील उत्तरप्रदेशचा माजी रहिवासी असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. हा प्रकार समोर येताच गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी व उत्तरप्रदेश पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे.
अल कायदाच्या भारतीय उपखंडातील युनिटचा प्रमुख मौलाना आसीम उमर हा उत्तरप्रदेशचा माजी रहिवासी असल्याचे वृत्त समोर आले आहे. याविषयी गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी म्हणाले, आसीम उमर हा भारतीय आहे की नाही यावर शिक्कामोर्तब झाले नसले तरी आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीवरुन तो भारतीय वंशाचा किंवा भारतीयच असावा असे दिसते.
आसीम उमरने उत्तरप्रदेशमधील दारुल उल उमलू या मदरशामधून शिक्षण घेतले असून १९९० च्या दशकात तो पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आला होता. यानंतर त्यांने भारत सोडून कराचीतील मदरसामध्ये शिक्षण घेतले. तिथूनच त्याची दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यांशी ओळख झाली असावी असे सूत्रांचे म्हणणे आहे.
मौलाना आसीम उमरने स्वत:चा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला असून अद्याप त्याने स्वतःची कधीही व्हिडीओ टेप जाहीर केलेली नाही. दहशतवादी संघटनेचे प्रमुख स्वत:ची ओळख न लपवता व्हिडीओ टेप जाहीर करतात. यामुळे उमर काही तरी लपवत आहे असे अधिका-यांनी निदर्शनास आणून दिले.
भारतीय यंत्रणांनी उमरची माहिती गोळा करण्याचे काम सुरु केले असून सध्या १९९० च्या दशकात सिमीमध्ये सक्रीय असलेल्या लोकांवर लक्षकेंद्रीत केले जात आहे. त्यांच्याकडून उमरविषयी माहिती जमा केली जात असल्याचे अधिका-यांनी सांगितले. तर देवबंदमधील दारुल उल उमलू या मदरशाच्या मौलानांनी या वृत्ताविषयी काहीही माहिती नसल्याचे सांगितले. आमच्याकडे अनेक मुलं शिकून जातात. त्यांची माहिती ठेवणे आमच्यासाठी कठीण आहे. छायाचित्र किंवा व्हिडीओ क्लिप बघितल्यास आम्ही आसीम उमरची ओळख पटवू शकू असे मदरशाच्या मौलानांनी सांगितले.