आघाडीच्या राजकारणाचा काँग्रेसकडून नव्याने विचार
By Admin | Updated: August 26, 2014 02:50 IST2014-08-26T02:50:14+5:302014-08-26T02:50:14+5:30
देशात उत्तर ते दक्षिणेकडील पोटनिवडणुकीतील निकालाने उत्साहित झालेल्या काँग्रेसने आघाडीच्या राजकारणाचा नव्याने विचार करण्यास सुरुवात केली आहे.

आघाडीच्या राजकारणाचा काँग्रेसकडून नव्याने विचार
शीलेश शर्मा, नवी दिल्ली
देशात उत्तर ते दक्षिणेकडील पोटनिवडणुकीतील निकालाने उत्साहित झालेल्या काँग्रेसने आघाडीच्या राजकारणाचा नव्याने विचार करण्यास सुरुवात केली आहे.
बिहारमध्ये जदयू, राजद आणि काँग्रेसच्या आघाडीने भाजपाला रोखण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपाला रोखण्यासाठी आघाडी मार्गाचा अवलंब करण्याबद्दल काँग्रेस विचार करू लागला आहे. मात्र, या राज्यांमध्ये काँग्रेससोबत कोणते पक्ष येऊ शकतील, याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही.
काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते विविध राज्यांतील अशा पक्षांची ओळख करून या आठवड्याच्या अखेरपर्यंत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना माहिती देतील. ए.के. अॅन्टोनी, अहमद पटेल, मधुसूदन मिस्त्री आणि अन्य नेत्यांना अशा प्रकारची शक्यता तपासण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्रात काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी आहे. परंतु काँग्रेस राष्ट्रवादीसोबतच नव्या घटक पक्षांच्या शोधात आहे. महाआघाडी स्थापन करून भाजपा-शिवसेनेच्या महायुतीला टक्कर द्यायची आहे. समजा काही कारणास्तव महाआघाडी स्थापन होऊ शकली नाही, तर अघोषित ताळमेळ बसविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे. परंतु त्यासाठी आधी काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसशी बोलणी करावी लागणार आहेत; कारण त्यांच्या अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही.
पोटनिवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना पक्षाचे सरचिटणीस शकील अहमद म्हणाले की, लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजपा मोदींची लाट असल्याचे सांगून प्रत्येक निवडणूक जिंकण्याचा दावा करीत होती. जनतेने १०० दिवस होण्यापूर्वीच दावा फेटाळून लावला आहे.