पहलाज निहलानी सेन्सॉरचे नवे अध्यक्ष
By Admin | Updated: January 20, 2015 01:24 IST2015-01-20T01:24:43+5:302015-01-20T01:24:43+5:30
सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे़

पहलाज निहलानी सेन्सॉरचे नवे अध्यक्ष
नवी दिल्ली : सरकारच्या धोरणावर आगपाखड करीत लीला सॅमसन यांनी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ सरकारने बोर्डाचे पुनर्गठन करीत अन्य नऊ सदस्यांचीही नियुक्ती केली़
डेरा सच्चाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मेसेंजर आॅफ गॉड’ या वादग्रस्त चित्रपटाला चित्रपट प्रमाणीकरण अॅपिलेट लवादाने (एफसीएटी) मंजुरी दिल्यानंतर लीला सॅमसन यांनी तडकाफडकी राजीनाम्याचा निर्णय घेतला होता़ बोर्डाने मनाई केली असतानाही एफसीएटीने प्रदर्शनाला मंजुरी दिल्याने त्या नाराज झाल्या होत्या़ त्यांच्या समर्थनार्थ बोर्डाच्या अनेक सदस्यांनीही राजीनामे दिले होते़
माहिती व प्रसारण मंत्रालयाने आज सोमवारी एका अधिकृत पत्रकाद्वारे निहलानी यांच्या नियुक्तीची माहिती दिली आहे़ केंद्र सरकारने पहलाज निहलानी यांना सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष नियुक्त केले आहे़ ते तीन वर्षे वा पुढील आदेशापर्यंत (जे आधी असेल) या पदावर राहतील, असे यात म्हटले आहे़ सरकारने बोर्डाचे नऊ सदस्यही नियुक्त केले आहेत़ या नऊ सदस्यांमध्ये भाजपा नेत्या वाणी त्रिपाठी टिक्कू, चित्रपट निर्माते अशोक पंडित, चंद्रप्रकाश द्विवेदी यांचा समावेश आहे़ अन्य सदस्यांमध्ये पटकथा लेखक मिहिर भुटा, सय्यद अब्दुल बारी, रमेश पतंगे, कलाकार जॉर्ज बेकर, अभिनेता आणि चित्रपट निर्माता जिविता आणि अभिनेता एस़ व्ही़ शेखर यांचा समावेश आहे़
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माता म्हणून पहलाज निहलानी ओळखले जातात. ९० च्या दशकात त्यांनी गोविंदाबरोबर ‘आँखे’, ‘शोला और शबनम’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली. इंडस्ट्रीत चित्रपट निर्मात्यांशी संबंधित गिल्ड आणि इंपा या संस्थांचेही त्यांनी नेतृत्व केले होते. चित्रपटसृष्टीशी निगडीत समस्यांवर नेहमीच आवाज उठवून सरकारी स्तरावर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी नेहमीच ते तत्पर असल्याचे इंडस्ट्रीत मानले जाते. तसेच गेल्या दोन दशकांपासून खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. पहलाज निहलानी हे सुप्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी यांचे बधू आहेत़
च्चित्रपटसृष्टीशी निगडीत व्यक्तीला अध्यक्षपद मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. लीला सॅमसन यांच्या आधी शर्मिला टागोर, आशा पारेख, अनुपम खेर, विजय आनंद यांनीही अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती.
च्सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाची धुरा ही गैरफिल्मी व्यक्तींना देण्यापेक्षा चित्रपटसृष्टीतल्याच ज्येष्ठ लोकांना दिली जावी, अशी अनेकांची पूर्वीपासून मागणी होती. या आठवड्यात निहलानी आपला पदभार स्वीकारतील, असे सूत्रांनी सांगितले.