नया साल वॅक्सीन के रूप में...; देशात लसीकरणाला सुरुवात होताच नवीन कॉलरट्यून जारी
By कुणाल गवाणकर | Updated: January 16, 2021 20:34 IST2021-01-16T20:30:44+5:302021-01-16T20:34:03+5:30
अमिताभ बच्चन यांचा आवाज हटवला; नव्या कॉलरट्यूनमध्ये लसीकरणाच्या सूचना

नया साल वॅक्सीन के रूप में...; देशात लसीकरणाला सुरुवात होताच नवीन कॉलरट्यून जारी
नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणाची सुरुवात भारतात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज लसीकरण अभियानास प्रारंभ झाला. त्यानंतर आता कोरोना लसीकरणावर आधारित नवीन कॉलरट्यून जारी करण्यात आली आहे. याआधीच्या कॉलरट्यूनमध्ये अमिताभ बच्चन यांचा आवाज होता. आताच्या कॉलरट्यूनमध्ये व्हॉईज ओव्हर आर्टिस्ट जसलीन भल्ला यांचा आवाज आहे. कोरोना लसीकरण अभियानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी नवी कॉलरट्यून जारी करण्यात आली. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनदेखील यातून करण्यात आलं आहे.
'नवीन वर्ष कोविड-१९ लसीच्या रुपात आशेचा नवा किरण घेऊन आलं आहे. भारतात विकसित करण्यात आलेली लस सुरक्षित आणि प्रभावी आहे. ती कोविड विरुद्ध आपल्या शरीरात प्रतिकारक्षमता निर्माण करते,' अशी माहिती नव्या कॉलरट्यूनच्या माध्यमातून देण्यात आली आहे. लसीवर विश्वास ठेवा आणि अफवांकडे दुर्लक्ष करा, असं आवाहन करण्यात आलं आहे. 'भारतीय लसीवर विश्वास ठेवा. तुमचा नंबर आल्यावर नक्की लस टोचून घ्या. अफवांवर विश्वास ठेवू नका,' अशी सूचना कॉलरट्यूनमधून करण्यात आली आहे.
याआधी कॉलरट्यूनमध्ये सुरुवातीला खोकल्याचा आणि त्यानंतर अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकू यायचा. कोविड-१९ चा धोका टाळण्यासाठी घ्यायच्या खबरदारीची माहिती बिग बी द्यायचे. कॉलरट्यूनमधून अमिताभ बच्चन यांचं आवाज हटवण्याची मागणी एका जनहित याचिकेच्या माध्यमातून दिल्ली उच्च न्यायालयात करण्यात आली होती. अमिताभ आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनाच कोरोना झाल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं होतं.