नेताजींचा ड्रायव्हर सर्वात वृद्ध
By Admin | Updated: April 18, 2016 02:36 IST2016-04-18T02:36:47+5:302016-04-18T02:36:47+5:30
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आझाद हिंद सेनेच्या काळातील ड्रायव्हर कर्नल निजामुद्दीन हे वयाच्या ११६ व्या वर्षी जगातील सर्वात वयोवद्ध व्यक्तीचा मान मिळविण्याचे दावेदार ठरले आहेत.

नेताजींचा ड्रायव्हर सर्वात वृद्ध
आझमगढ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आझाद हिंद सेनेच्या काळातील ड्रायव्हर कर्नल निजामुद्दीन हे वयाच्या ११६ व्या वर्षी जगातील सर्वात वयोवद्ध व्यक्तीचा मान मिळविण्याचे दावेदार ठरले आहेत.
कर्नल निजामुद्दीन ऊर्फ सैफुद्दीन यांच्या वयाला रविवारी ११६ वर्षे तीन महिने १४ दिवस पूर्ण झाले. जगातील सर्वात वयोवद्ध म्हणून नोंद झालेल्या जपानी व्यक्तीचे यंदाच्या फेब्रुवारीत निधन झाले. त्यामुळे आता तो मान कर्नल निजामुद्दीन यांना मिळेल, असे बोलले जाते. कर्नल निजामुद्दीन आणि त्यांची पत्नी अजबुनिशा हिच्यासोबत येथील स्टेट बँकेत दोघांच्या नावे संयुक्त खाते उघडण्यासाठी जन्मतारखेचे जे दस्तावेज सादर केले त्यावरून त्यांचे वय ११६ वर्षे असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी सादर केलेल्या मतदार ओळखपत्रावर व पासपोर्टवर त्यांचा जन्म सन १९०० मध्ये झाल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे कर्नल निजामुद्दीन यांची पत्नी १०७ वर्षांची आहे.
आपल्या नेहमीच्या बघण्यातील निजामुद्दीन चाचा जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती ठरावेत याने स्थानिक नागरिकांना साश्चर्य आनंद झाला. जिल्हा प्रशासन या दाम्पत्याचा यथोचित सत्कार करण्याच्या विचारात आहे. निझामुद्दीन यांचा जन्म उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यात मुबारकपूर भागातील धाकवा खेड्यात झाला. त्यांना स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा मिळाला तो २०१३ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी. मे २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निझामुद्दीन यांचे चरणस्पर्श करून त्यांचा सत्कार केला होता व त्यांचे आशीर्वाद मागितले होते.