नेस्लेच्या सेरेलॅकमध्ये आढळले जिवंत किडे !
By Admin | Updated: June 17, 2015 04:01 IST2015-06-17T04:01:08+5:302015-06-17T04:01:08+5:30
नेसले या बहुराष्ट्रीय कंपनीच्या मॅगीवरील बंदीची चर्चा विरण्यापूर्वीच याच कंपनीच्या सेरेलॅक या बेबीफूडच्या बंद पाकिटात किडे आढळून

नेस्लेच्या सेरेलॅकमध्ये आढळले जिवंत किडे !
कोईमतूर : नेसले या बहुराष्ट्रीय कंपनीच्या मॅगीवरील बंदीची चर्चा विरण्यापूर्वीच याच कंपनीच्या सेरेलॅक या बेबीफूडच्या बंद पाकिटात किडे आढळून आल्याने कंपनीच्या अडचणीत भर पडण्याची चिन्हे आहेत. कोईमतूर शहरातील एका आयटी व्यावसायिकाने आपल्या एक वर्षाच्या मुलासाठी सेरेलॅकचे पाकीट खरेदी केले असता, त्या पाकिटात जिवंत किडे आढळले.
एस. श्रीराम असे या आयटी व्यावसायिकाचे नाव असून, त्यांनी पेरूर येथील औषधाच्या दुकानातून नेस्लेच्या सेरेलॅकचे पाकीट रविवारी खरेदी केले होते. त्यांच्या पत्नीने सोमवारी दुपारी हे पाकीट उघडले असता, त्यात लाल रंगाचे किडे आढळून आले. गहू व दूध यांचे मिश्रण असलेले हे लहान मुलांचे खाद्य फेब्रुवारी २०१६ पर्यंत चांगले (सेवन करण्यायोग्य) असेल, असे या पाकिटावर लिहिले होते.
एस. श्रीराम यांनी मंगळवारी अन्न सुरक्षा खात्याकडे तक्रार केली असून, सेरेलॅकचे ते पाकीट सरकारी प्रयोगशाळेत चाचणीसाठी देण्यात आले आहे. नेस्लेला मॅगीबंदीमुळे आतापर्यंत ३०० हून अधिक कोटींचे नुकसान झाले असून, त्यात आता या घटनेने आणखी भर पडण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)