नेपाळच्या इशा-यावर भारतातून चोरी होतात आयफोन, आयपॅड
By Admin | Updated: March 7, 2017 16:16 IST2017-03-07T16:16:43+5:302017-03-07T16:16:43+5:30
क्राईम ब्रांचने बिहारमधून एका अशा चोराला अटक केली आहे जो आयफोन, आयपॅड सारख्या महागड्या वस्तू चोरी करण्यात सहभागी होता

नेपाळच्या इशा-यावर भारतातून चोरी होतात आयफोन, आयपॅड
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 7 - क्राईम ब्रांचने बिहारमधून एका अशा चोराला अटक केली आहे जो आयफोन, आयपॅड सारख्या महागड्या वस्तू चोरी करण्यात सहभागी होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा अहमदाबाद क्राईम ब्रांचचे अधिकारी बिहारमध्ये पोहोचले तेव्हा इतर दहा राज्यांचं पोलीस पथकही त्या चोराला पकडण्यासाठी तिथे पोहोचलं होतं. मात्र शेवटी अहमदाबाद क्राईम ब्रांचला चोराच्या मुसक्या आवळण्यात यश आलं.
महत्वाची गोष्ट म्हणजे नेपाळमधील ग्रे मार्केटमध्ये चोरीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नेपाळमधील ही मागणी पुर्ण करण्यासाठी भारतात एकूण 10 टोळ्या सक्रिय आहेत. या सर्व टोळ्या बिहारमधून आपलं नेटवर्क चालवत होत्या. अटक करण्यात आलेल्या चोराने माहिती दिली आहे की, चोरी करण्यासाठी फक्त अहमदाबाद आणि सूरत नाही तर सौराष्ट्रसारख्या छोट्या शहरांचीही निवड केली जात होती. पोलिसांच्या सुत्रांनुसार या महागड्या वस्तूंच्या चोरीचं मुख्य केंद्र नेपाळमध्ये आहे.
15 दिवसांपुर्वी एका टोळीने अहमदाबादमधील शोरुममधून 40 लाखांचे गॅजेट्स चोरी केले होते. क्राईम ब्रांचच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला. हाती लागलेल्या पुराव्यांच्या आधारे पोलीस पथक बिहारला पोहोचलं आणि चोराला अटक केली. या टोळीचा म्होरक्या नेपाळमध्ये असून तेथील बाजारात येणा-या मागणीनुसार टोळीला चोरी करण्याचा आदेश देत होता. चोरी करण्यासाठी दोन ते तीन दिवस शोरुमची रेकी केली जात असे, आणि नंतर चोरी करुन दुस-या शहरात निघून जात. चोरी करण्यात आलेला माल नेपाळमध्ये अर्ध्याहून जास्त कमी किंमतीत विकला जात होता.