नाशिकमधील नेपाळी बांधव अस्वस्थ
By Admin | Updated: April 26, 2015 22:46 IST2015-04-26T22:10:45+5:302015-04-26T22:46:18+5:30
नाशिक : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे काठमांडूमध्ये प्रचंड जीवितहानी झाल्याचे वृत्त पसरताच शहरातील नेपाळी बांधवांमध्ये दिवसभर चिंता व्यक्त केली जात होती. प्रत्येकजण आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती जाणून घेत होते. दरम्यान, काहींचा संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली.

नाशिकमधील नेपाळी बांधव अस्वस्थ
नाशिक : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे काठमांडूमध्ये प्रचंड जीवितहानी झाल्याचे वृत्त पसरताच शहरातील नेपाळी बांधवांमध्ये दिवसभर चिंता व्यक्त केली जात होती. प्रत्येकजण आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती जाणून घेत होते. दरम्यान, काहींचा संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली.
शनिवारच्या सकाळी ८० वर्षांतील सर्वांत मोठ्या विनाशकारी भूकंपाच्या धक्क्याने नेपाळ हादरले. या भूकंपामध्ये राजधानी काठमांडूमधील धरहरा टॉवर, दरबार चौक या ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त झाल्या. ७.९ रिश्टर स्केल तीव्रतेने भूकंपाचे हादरे बसल्याने प्रचंड प्रमाणात हानी झाली. दरम्यान, यामुळे शहरातील नेपाळी बांधव आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधून तेथील परिस्थितीचा आढावा घेत होते, तर ज्यांचा संपर्क होऊ शकला नाही, अशांनी नेपाळकडे जाण्यासाठी थेट नाशिकरोड रेल्वेस्थानक गाठले. मात्र लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या १५ मेपर्यंत फुल्ल असल्याने त्यांना तिकीट मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांच्यात घबराट पसरली होती, तर काहींना रडू कोसळले होते. दरम्यान, सायंकाळी ७ वाजेनंतर नाशिकरोड भागात सर्व नेपाळीबांधव एकत्र जमले होते. सकाळीच याबाबतचे वृत्त कळाल्याने बहुतेकांनी कामावर न जाता कुटुंबीयांशीच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत संपर्क साधण्याचे काम सुरू होते. शहरात तीन हजारांपेक्षा अधिक नेपाळी बांधव आहेत.
---
चौकट
सकाळी टीव्हीवर याबाबतचे वृत्त कळताच मी कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दुपारी १२ वाजेपर्यंत संपर्क होऊ न शकल्याने मनात भीती निर्माण झाली होती. दिवसभर कुटुंबीयांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती जाणून घेत होतो.
- विशाल शर्मा
कुटुंबातील काही मंडळी बाहेरगावी असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. नातेवाइकांना संपर्क करून याबाबतची माहिती घेत होतो. एखाद्याच्या कुटुंबीयांच्या खुशालीची माहिती मिळताच त्याला त्याबाबतचे कळविले जात होते.
- भूपेन्द्र डिशी