ऑपरेशन सिंदूरमुळे संपूर्ण जगाला भारताच्या ताकदीचा परिचय झाला. या ऑपरेशनदरम्यान भारतीय हवाई दलाने अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आणि पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. आता हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, भारतीय हवाई दलाने आणखी राफेल लढाऊ विमानांची मागणी केली आहे.
भारतीय हवाई दलाने फायटर स्क्वॉड्रनची कमतरता भरून काढण्यासाठी एमआरएफए प्रोजेक्टअंतर्गत आणखी राफेलची मागणी केली आहे. महत्वाचे म्हणजे, हवाई दलाने ११४ मल्टी रोल फायटर एअरक्राफ्ट अर्थात बहुउद्देशीय लढाऊ विमाने (MRFA) खरेदीसंदर्भात आपले मत मांडले आहे. यामुळे यासाठी फ्रान्स आणि भारत सरकार यांच्यात करार होऊ शकतो.
भारतीय हवाई दलाची ताकद...? -माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय हवाई दलाकडे सध्या लढाऊ विमानांचे २९ स्क्वाड्रन आहेत. त्यांना ४२ स्क्वॉड्रनची आवश्यकता आहे. याशिवाय पाकिस्तानचा विचार करता, त्यांच्याकडे एकूण २५ स्क्वॉड्रन आहेत. तर, चीनचा विचार करता, त्यांच्याकडे ६६ स्क्वॉड्रन आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पाकिस्तान आणि चीनकडे पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने आहेत. तर भारताकडे राफेल हे सर्वात आधुनिक लढाऊ विमान आहे, हे विमान ४.५ व्या पिढीचे लढाऊ विमानं मानले जाते. मात्र असे असले तरी, भारतीय हवाई दल पाकिस्तानवर भारी पडले.
तत्पूर्वी, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या दरम्यान, भारतीय हवाई दलाने शंभराहून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. पाकिस्तानचे हवाई तळही उद्ध्वस्त केले. याशिवाय, पाकिस्ताननेही भारताच्या अनेक ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र, भारतीय हवाई दलाने तो पार हाणून पाडला. आता लवकरच भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार आहे.