असून शेजारी...बसले रुसूनी! कुंभमेळा बैठक : दोन्ही आयुक्तांचे मौन
By Admin | Updated: March 24, 2015 23:36 IST2015-03-24T23:07:09+5:302015-03-24T23:36:34+5:30
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांकडून पुरेसा बंदोबस्त मिळत नसल्याची व्यथा पालकमंत्र्यांच्या पुढ्यात व्यक्त करणारे महापालिका आयुक्त व पोलीस बळ देण्यास ठाम नकार देणार्या पोलीस आयुक्तांमध्ये झडलेल्या खडाजंगीनंतर या दोघांमधील कटुता विकोपाला गेल्याचे चित्र मंगळवारी झालेल्या कुंभमेळ्याच्या आढावा बैठकीदरम्यान दिसले. शेजारी बसूनही एकमेकांशी चकार शब्द न बोलता दोघांनीही आपल्यातील अबोला कायम ठेवल्याची बाब या बैठकीतील अन्य अधिकार्यांच्या नजरेतून सुटली नाही.

असून शेजारी...बसले रुसूनी! कुंभमेळा बैठक : दोन्ही आयुक्तांचे मौन
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांकडून पुरेसा बंदोबस्त मिळत नसल्याची व्यथा पालकमंत्र्यांच्या पुढ्यात व्यक्त करणारे महापालिका आयुक्त व पोलीस बळ देण्यास ठाम नकार देणार्या पोलीस आयुक्तांमध्ये झडलेल्या खडाजंगीनंतर या दोघांमधील कटुता विकोपाला गेल्याचे चित्र मंगळवारी झालेल्या कुंभमेळ्याच्या आढावा बैठकीदरम्यान दिसले. शेजारी बसूनही एकमेकांशी चकार शब्द न बोलता दोघांनीही आपल्यातील अबोला कायम ठेवल्याची बाब या बैठकीतील अन्य अधिकार्यांच्या नजरेतून सुटली नाही.
जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीची सूत्रे काही काळ कुशवाह यांनी महापालिका आयुक्त गेडाम यांच्याकडे सोपविल्याने त्यांनी काही खात्यांचा आढावा घेतला; परंतु शेजारी बसलेल्या पोलीस आयुक्तांनी या सार्या चर्चेत कुठलाच सहभाग नोंदविला नाही. स्वत: गेडाम यांनीदेखील पोलीस आयुक्तांकडे दुर्लक्ष करण्याचीच भूमिका घेत, महापालिकेच्या आरोग्य विभागाचा आढावा घेतला. दोन्ही अधिकार्यांमधील दुरावा अद्यापही कायम असल्याचे या बैठकीच्या निमित्ताने स्पष्ट झाले. दरम्यान, या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत सूक्ष्म नियोजन करण्याचे ठरविण्यात आले. एखाद्या विद्युत वाहिनीत बिघाड झाल्यास तपोवन आणि गणेशवाडी उपकेंद्राबरोबरच टाकळी, मेरी आणि आडगाव येथील उपकेंद्रांवरून विद्युत पुरवठा करण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे. मार्च अखेरपर्यंत उपकेंद्रांना जोडणार्या सर्व वाहिन्यांना जोडण्याचे काम पूर्ण होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
विद्युत व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मेरी, शालिमार, तपोवन, टाकळी, गणेशवाडी, दहीपूल, शासकीय रुग्णालय, त्र्यंबकेश्वर व खंबाळे येथे नियंत्रण कक्ष स्थापण्यात येणार आहेत. प्रत्येक नियंत्रण कक्षात तीन शिफ्टमध्ये अधिकारी व कर्मचारी कार्यरत असतील. विद्युत विभागाने धोकेदायक वाहिन्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले असून, त्र्यंबकेश्वर येथे भूमिगत लघुदाब वाहिन्यांचे कामी करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. रामकुंड, कुशावर्त आणि त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात आपत्कालीन परिस्थितीत जनरेटरद्वारे विद्युत पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. एकलहरे येथे बिघाड झाल्यास पडघा, चाळीसगाव, मनमाड, बाभळेश्वर किंवा नवसारी येथील विद्युत उपकेंद्रांतून वीज घेण्याची व्यवस्था करण्यात येणार असून, टाकळी, मेरी आणि आडगाव उपकेंद्रे रिंग सिस्टीमद्वारे जोडण्यात आल्याने तत्काळ वीजपुरवठा करता येणे शक्य होणार आहे.