राष्ट्रवादी विरोधीपक्षासाठीही लायक नाही - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: October 21, 2014 10:12 IST2014-10-21T09:54:30+5:302014-10-21T10:12:42+5:30
विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याचीही राष्ट्रवादी काँग्रेसची लायकी उरलेली नाही अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी विरोधीपक्षासाठीही लायक नाही - उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - भ्रष्टाचाराची प्रकरण दाबण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असून विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याचीही राष्ट्रवादीची लायकी उरलेली नाही अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठिंबा देणा-या राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. पवारांनी भाजपला हाफच़ड्डीवाल्यांचा पक्ष अशी खिल्ली उडवली होती. आता तेच पवार आणि प्रफुल्ल पटेल हे हाफचड्डीच्या प्रेमात पडलेत असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. भाजपने प्रचारादरम्यान राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा केली. आता भाजपची सत्ता येणार हे दिसताच पटेल यांनी उगवत्या सूर्यासमोर लोटांगण घातले असे ठाकरेंनी नमूद केले. राज्यातील जनतेने काँग्रेस व राष्ट्रवादीला नाकारले मात्र काही ठिकाणी भाजप - शिवसेनेच्या मतविभाजनाचा फायदा काँगेस व राष्ट्रवादीला झाला असा पुनरुच्चारही त्यांनी केला. भ्रष्ट चिखलाने माखलेली लोक गंगेत उतरुन पवित्र होण्याचा प्रयत्न करत असून गंगा गढूळ होऊ नये हीच आमची इच्छा. बाकी प्रत्येकाने त्यांचा निर्णय घ्यावा असे त्यांनी भाजपाला उद्देशून म्हटले आहे.