Naxalite Encounter : काही दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED स्फोटात आठ जवानांना वीरमरण आले होते. आता अवघ्या दहा दिवसांत सुरक्षा दलांनी या घटनेचा बदला घेतला आहे. आज(16 जानेवारी 2025) सकाळपासून विजापूरच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी आतापर्यंत 12 नक्षलवाद्यांना ठार केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजापूर आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या तीन जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांकडून ही मोठी कारवाई सुरू आहे. सकाळपासून नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या गोळीबारात 12 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले असून, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी चकमकीच्या ठिकाणाहून एसएलआरसह अनेक हायटेक शस्त्रेही जप्त केली आहेत.
DRG विजापूर, DRG सुकमा, DRG दंतेवाडा, कोब्रा 204, 205, 206, 208, 210 आणि CARIPU 229 बटालियनचा या ऑपरेशनमध्ये सहभाग आहे. या सर्व बटालियनचे सैनिक नक्षलवाद्यांविरोधात मोठ्या कारवाया करत आहेत. अजूनही विजापूरमधील मरुधबाका आणि पुजारी कांकेर भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सध्या लपून बसलेल्या नक्षलवाद्यांचा शोध घेतला जातोय.
6 जानेवारी रोजी 8 जवान शहीद छत्तीसगडमधील विजापूर येथील कुत्रू जंगलात 6 जानेवारी रोजी नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनाला भूसुरुंग लावून उडवले होते. या दुर्दैवी घटनेत 8 जवान शहीद झाले, तर एका चालकाचाही मृत्यू झाला होता. हे सर्व सैनिक अबुझमद भागात नक्षलविरोधी अभियान राबवून परतत होते. आता अखेर दहा दिवसांतच सुरक्षा दलांनी आपल्या साथीदारांच्या बलिदानाचा बदला घेतला आहे.