PM Narendra Modi PMO Office: पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे झाले आहेत. केवळ देशातून नाही, तर जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात येत आहेत. अवघ्या काही दिवसांनी नवत्रोत्सव सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नवरात्रीचे पर्व विशेष असते. नवरात्रोत्सवाचा मुहूर्त साधत पंतप्रधान कार्यालय दुसरीकडे शिफ्ट केले जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
नवरात्रीदरम्यान पंतप्रधान कार्यालय साउथ ब्लॉकमधून शिफ्ट होऊ शकते. नवरात्रोत्सव २२ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या काळात पंतप्रधान कार्यालय, कॅबिनेट सचिवालय आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय हे तीनही नवीन पत्त्यावर शिफ्ट होऊ शकतात. याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचे म्हटले जात आहे. आताच्या घडीलापंतप्रधान कार्यालय रायसीना हिल्सवर असलेल्या राष्ट्रपती भवनातील साउथ ब्लॉकमध्ये आहे. एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह प्रकल्पांतर्गत, पंतप्रधान, कॅबिनेट सचिवालय आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय यांची नवीन कार्यालये तीन इमारतींमध्ये असतील.
कर्तव्य भवन ३ चे उद्घाटन
या प्रकल्पाचे काम बऱ्याच काळापासून सुरू आहे. जुन्या इमारतीत अद्ययावत सुविधांचा अभाव होता, जागेची कमतरता भासत होती. सतत समस्या येत होत्या. म्हणूनच आता सदर कार्यालये हलवली जात आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्तव्य भवन ३ चे उद्घाटन केले. त्या प्रसंगी त्यांनी ब्रिटिशकालीन इमारतींमध्ये पुरेशी जागा, प्रकाशयोजना आणि वायुवीजन नसल्यावर भर दिला. एका रिपोर्टनुसार, भविष्यात पंतप्रधान कार्यालयाचे नावही बदलले जाऊ शकते. सेवांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दुसरे नाव विचारात घेतले जाऊ शकते, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, काही वृत्तपत्रांनी यासंदर्भात रिपोर्ट दिले आहेत. पंतप्रधान कार्यालय (पीएमओ), कॅबिनेट सचिवालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि एक कॉन्फरन्स सेंटर (इंडिया हाऊस) यांचे बांधकाम सुरू आहे. ते जुन्या साउथ ब्लॉकला लागून आहेत. नवीन कार्यालय अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल आणि ते पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ असेल.