‘केजरी’मंडळात नव्यांना संधी!
By Admin | Updated: February 13, 2015 02:05 IST2015-02-13T02:05:28+5:302015-02-13T02:05:28+5:30
आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राजधानी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली

‘केजरी’मंडळात नव्यांना संधी!
नवी दिल्ली : दिल्लीत दुस-यांदा मुख्यमंत्री बनण्यासाठी सज्ज असलेले आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राजधानी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली. दरम्यान, ‘आप’च्या मंत्रिमंडळात केजरीवाल यांचे विश्वासू सहकारी मनिष सिसोदिया उपमुख्यमंत्री होतीव गेल्या वेळच्या मंत्रिमंडळातील किमान चारजणांना डच्चू देऊन नवे चेहरे आणले जातील, असे पक्षाच्या सूत्रांकडून समजते.
केजरीवाल यांनी सिसोदिया यांच्यासह सकाळी १०.३० वाजता ७, रेस कोर्स या मोदींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी १४ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेल्या आपल्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्याचे निमंत्रणही केजरीवाल यांनी मोदींना दिले. तथापि आपल्या पूर्वनिर्धारित कार्यक्रमांमुळे मोदी यांनी केजरीवाल यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शविली असल्याची माहिती सिसोदिया यांनी दिली. मोदींची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर सिसोदिया म्हणाले, ‘आम्ही पंतप्रधानांसोबत १५ मिनिटे चर्चा केली. यावेळी आम्ही दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर विचार करण्याचे आश्वासन मोदींनी दिले.’