राष्ट्रीय महत्त्वाचे-आतील पान

By Admin | Updated: January 22, 2015 00:06 IST2015-01-22T00:06:56+5:302015-01-22T00:06:56+5:30

National Importance-Inner Home | राष्ट्रीय महत्त्वाचे-आतील पान

राष्ट्रीय महत्त्वाचे-आतील पान

>तेलंगणात स्वाईन फ्लूचे ११ बळी
हैदराबाद-तेलंगणात या वर्षी स्वाईन फ्लूने ११ जणांचा बळी घेतला असून राज्य सरकारने या घातक आजाराचा सामना करण्यासाठी केंद्राकडे मदत मागितली आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून राज्याला मदत करण्याची विनंती केली. मोदींनी त्यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
----------------------------
भूसुरुंगाचा स्फोट, जवान जखमी
रायपूर-छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात भूसुरुंगाचा स्फोट होऊन छत्तीसगड सशस्त्र दलाचा जवान जखमी झाला आहे. आवापल्ली भागात मुरदंडा गावात प्रेशरबॉम्बवर पाय पडल्याने जवान गंगेश यादव हा जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असून नक्षल्यांच्या शोधात पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
-----------------------
बँकेच्या तिजोरीतून ५६ लाख पळविले
होशंगाबाद-भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील तिजोरी फोडून त्यातील ५६.४० लाखांची रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना येथे घडली. मंगळवारी रात्री या चोरट्यांनी बँकेची जाळी कापून आत प्रवेश केला व गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी फोडली. या ठिकाणी संध्याकाळी ६ नंतर कोणताही सुरक्षा जवान तैनात नव्हता. पोलीस चोरट्यांचा तपास करीत अहेत.
-----------------------
अवैध वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला अटक
फरिदाबाद- येथे अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. येथील बडौली गावात कल्लू नावाच्या व्यक्तीजवळ एक बांगलादेशी युवक राहत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
------------------------------------
नाश्ता केल्यानंतर ५८ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली
तंजावूर- येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या उपाहारगृहात बुधवारी सकाळी नाश्ता केल्यानंतर ५८ विद्यार्थ्यांना चक्कर व उलटीचा त्रास सुरू झाला. यातील १० विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात अले असून बाकीच्या विद्यार्थ्यांवरही उपचार करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
--------------------------------
पाक टीव्ही चॅनेल्सबाबत सरकारकडे विचारणा
नवी दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयाने, निर्बंध घातलेल्या पाकिस्तानी टीव्ही चॅनेल्सला भारतविरोधी कार्यक्रम प्रसारित करण्यापासून रोखण्यासाठी उचलेल्या पावलांची माहिती देण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत. मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी व न्या. राजीव सहाय एंडलॉ यांच्या पीठाने याबाबत निर्देश दिले आहेत.
---------------------------------
पाच पोलीस निलंबित
इंदूर- क्रिकेटच्या सट्टाप्रकरणी एका आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एका निरीक्षकासह पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आबिद खान यांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्रनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध केलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली.
-------------------------------
हकिकत व भेटीगाठी आयोगाच्या स्थापनेची मागणी
श्रीनगर- जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी दोन दशकांपासून हिंसेने ग्रासलेल्या पंडित व मुस्लीम समुदायाला एकत्र आणण्याकरिता हकिकत व भेटीगाठी आयोगाच्या स्थापनेची मागणी केली आहे. ही स्थापना करण्याची जबाबदारी भारत व पाकिस्तान सरकारची असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे.
--------------------------------
इंडियन मुजाहिदीनच्या सदस्यांच्या कोठडीत वाढ
बेंगळुरु-इंडियन मुजाहिदीन या निर्बंध घातलेल्या संघटनेच्या चार संदिग्ध सदस्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली असून न्यायालयाने ती ३ फेब्रुवारीपर्यंत वाढविली आहे. अब्दुस सबूर, रियास सईदी व सद्दाम हुसेन यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात अली आहे. या चौघांना ११ जानेवारी रोजी मेंगळुरूच्या विमानतळावर अटक करण्यात आली होती.
-------------------------------
इबोलासदृश लक्षणे असलेल्या व्यक्तीचे निधन
नवी दिल्ली-इबोलाने बाधित असल्याच्या संशयावरून एम्समध्ये दाखल झालेल्या एका व्यक्तीचे बुधवारी सकाळी निधन झाले. मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू सीसीएचएफ या आजाराने झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. हा व्यक्ती राजस्थानातील जोधपूरच्या रुग्णालयातून पाठविण्यात आला होता.
-------------------------------
बसपासोबत हातमिळवणीच्या वृत्ताचे खंडन
लखनौ- समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी भाजपाला पराभूत करण्यासाठी बसपासोबत हातमिळवणी करण्याच्या वृत्ताला फेटाळून लावले आहे. अशा प्रकारचे कुठलेही वक्तव्य दिले नसल्याचे त्यांनी म्हटले अहे.
------------------------------
सुनंदाचा मोबाईल व लॅपटॉपची तपासणी
अहमदाबाद- दिल्ली पोलिसांनी काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या दिवंगत पत्नीचा मोबाईल व लॅपटॉप गांधीनगर येथील फोरेन्सिक विज्ञान संचालनालयाकडे तपासणीसाठी पाठविला आहे. या दोन उपकरणांच्या मदतीने सुनंदाच्या मृत्यूचे रहस्य उकलण्याचा प्रयत्न करणार असल्याचे या संस्थेचे प्रमुख व्यास यांनी म्हटले आहे.
--------------------------------
एल.एन. मिश्रा हत्याकांडप्रकरणी सीबीआयला नोटीस
नवी दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयाने ४० वर्षांपूर्वी तत्कालीन रेल्वेमंत्री एल.एन. मिश्रा यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या दोन आरोपींच्या जामीन अर्जावर सीबीआयला नोटीस जारी केली. याप्रकरणी चार जणांना जन्मठेपेची शिक्षा जाली होती.
-----------------------------------
अल्पवयीन मुलाच्या पालनपोषणाकरिता दरमहा ५० हजार देण्याचा आदेश
नवी दिल्ली-कौटुंबिक हिंसेच्या एका प्रकरणात न्यायालयाने एका व्यक्तीला त्याच्या मुलांच्या पाालनपोषणाकरिता त्याच्या पत्नीला ५० हजार रुपये दरमहा देण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने या व्यक्तीचे, त्याची पत्नी अन्य व्यक्तीसोबत अवैधरीत्या राहत असून ती या भत्त्याकरिता लायक नाही हे म्हणणे खोडून काढले आहे.
------------------------------------ जयपुरात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चर्चा
जयपूर-पुस्तकांवर निर्बंध घालणे वा त्यांना जाळून टाकण्याचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या असहिष्णुतेने भारतीय लोकशाहीसमोर मोठा धोका उत्पन्न केला असल्याचे वास्तव येथील साहित्य उत्सवात अधोरेखित करण्यात आले. तामिळ लेखक पेरुमल मुरुगन यांच्या अलीकडील प्रकरणावर येथे ही चर्चा आयोजित करण्यात आली होती.

Web Title: National Importance-Inner Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.