राजस्थानमधील उड्डाणपूलाला नथुराम गोडसेंचे नाव
By Admin | Updated: February 5, 2015 14:11 IST2015-02-05T13:59:32+5:302015-02-05T14:11:45+5:30
राजस्थानमधील नव्याने बांधलेल्या उड्डाणपूलाला महात्मा गांधी यांची हत्या करणा-या नथुराम गोडसेंचे नाव दिल्याने वाद निर्माण झाला आहे.

राजस्थानमधील उड्डाणपूलाला नथुराम गोडसेंचे नाव
ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. ५ - राजस्थानमधील नव्याने बांधलेल्या उड्डाणपूलाला महात्मा गांधी यांची हत्या करणा-या नथुराम गोडसेंचे नाव दिल्याने वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत उड्डाणपूलाचा कंत्राटदार नीरजकुमार शर्माला अटक केली आहे.
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात २२ कोटी रुपये खर्च करुन नवीन उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. हा पुल २०१२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या कार्यकाळात मंजूर झाला असून आता वसुंधरा राजे यांच्या काळात पूलाचे काम पूर्ण झाले आहे. या पूलावर दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी नथुराम गोडसे पूल असा फलक लावण्यात आला होता. भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी नथुराम गोडसे यांना देशभक्त महटले होते. पूलाच्या कंत्राटदाराने यातून प्रेरणा घेत पुलाला गोडसेंचे नाव दिले होते. पूलाचे उद्घाटनापूर्वीच ठेकेदाराने हा प्रताप केल्याने वसुंधरा राजे यांच्या सरकारची नाचक्की झाली होती. अखेरीस पोलिसांनी पूलाच्या कंत्राटदाराला अटक केली व पूलावरील फलकही हटवला. या कंत्राटदाराने अन्य एका पूलाला उद्घाटनापूर्वीच मंगल पांडे यांचे नाव दिले होते. पोलिसांनी हा फलकही हटवल्याचे समजते.