ज्येष्ठ नागरिक सभागृहाच्या नशिबी कुलूपच
By Admin | Updated: May 23, 2016 00:14 IST2016-05-22T19:39:31+5:302016-05-23T00:14:16+5:30
कलानगरमधील प्रकार : चावीबाबत टोलवाटोलवी, ज्येष्ठ नागरिकांची तक्रार

ज्येष्ठ नागरिक सभागृहाच्या नशिबी कुलूपच
कलानगरमधील प्रकार : चावीबाबत टोलवाटोलवी, ज्येष्ठ नागरिकांची तक्रार
नाशिक : आयुष्याच्या संध्याकाळी सुखद-दु:खद अनुभव एकमेकांना सांगावेत, मन हलके करण्यासाठी विविध करमणुकीचे कार्यक्रम करता यावे यासाठी महापालिकेने दिंडोरी रोडवरील कलानगरमध्ये महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक सभागृह बांधले आहे़ मात्र, या सभागृहाच्या नशिबी कुलूपच सदासर्वदा कुलूप असून कोणत्याही वापराविना हे सभागृह अक्षरश: पडून असल्याचे चित्र आहे़
नाशिक महापालिकेतील प्रभाग क्रमांक एक मधील कलानगरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी महात्मा फुले सभागृह बांधण्यात आले आहे़ या सभागृहाचे काम पूर्ण झाले असून ते कायम कुलूपबंद असते़ मनपाने ज्या उद्देशाने व ज्यांच्यासाठी हे सभागृह बांधले त्यांना काहीच उपयोग होत नाही़ विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक या सभागृहाची चावी मागण्यासाठी नगरसेवकाकडे गेले की त्यांना एका खासगी माणसाकडे चावी असल्याचे सांगण्यात येते़
नगरसेवकाच्या मर्जीतील या व्यक्तीकडे चावी मागितली की तो नगरसेवकाकडे चावी असल्याचे सांगतो़ थोडक्यात नगरसेवक व त्याच्या मर्जीतील माणसाकडून ज्येष्ठ नागरिकांची छळवणूक सुरू असल्याची तक्रार येथील ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे़सार्वजनिक जागेवर बांधण्यात आलेल्या या सभागृहाचा उपयोग होणार नसेल तर महापालिकेचा सभागृह बांधण्याचा उद्देश तरी काय, असा सवाल परिसरातील ज्येष्ठ नागरिकांकडून केला जातो आहे़ (प्रतिनिधी)