नाशिकच्या सायकलिस्टचा लेहजवळ मृत्यू
By Admin | Updated: July 31, 2015 22:25 IST2015-07-31T22:25:17+5:302015-07-31T22:25:17+5:30
हृदयक्रिया बंद : मनाली-लेहदरम्यानची घटना

नाशिकच्या सायकलिस्टचा लेहजवळ मृत्यू
ह दयक्रिया बंद : मनाली-लेहदरम्यानची घटना नाशिक : येथील व्यावसायिक हर्षद श्रीकांत पूर्णपात्रे (३९) यांचा मनाली ते लेहदरम्यान सायकलिंग करीत असताना, ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन हृदय बंद पडल्याने मृत्यू झाला. आधाराश्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होत. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. हर्षद पूर्णपात्रे यांना सायकलिंगचा छंद असून, त्यांनी यापूर्वी देशभरात अनेक ठिकाणी सायकलिंग केले आहे. गेल्या सोमवारी (दि. २७) ते लेह-लडाख भागात सायकलिंगसाठी निघाले होते. नाशिकहून मुंबई, मुंबईहून विमानाने मनाली व तेथून पुढील प्रवास ते सायकलद्वारे करणार होते. बंगळुरू, मुंबई येथून गौरांग प्रधान, राधिका बोरकर यांच्यासह आणखी एक जण असे एकूण तीन सहकारी त्यांच्यासोबत होते. या चारही जणांनी आज सकाळी मनाली येथून लेहच्या दिशेने सायकलिंगला सुरुवात केली; मात्र मध्यावर येताच उंचावर हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने पूर्णपात्रे यांना श्वसनाला त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना वाहनात बसवण्यात आले; मात्र त्यातच हृदय बंद पडून सकाळी अकराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. पूर्णपात्रे यांचा मृतदेह नाशिकमध्ये आणण्यासाठी त्यांचे मामा डॉ. अरुण बेहेरे व मेव्हणे विशाल जडे आज सायंकाळी लेहकडे रवाना झाले. उद्या सायंकाळ वा परवा सकाळपर्यंत मृतदेह नाशिकमध्ये पोहोचण्याचा अंदाज असून, त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पूर्णपात्रे यांच्या पश्चात वडील डॉ. श्रीकांत, आई ॲड. शशिप्रभा, पत्नी मनीषा, मुलगी श्रुती, लहान बंधू आल्हाद यांच्यासह मोठा परिवार आहे. आल्हाद हे अमेरिकेत वास्तव्यास असून, ते नाशिककडे निघाले आहेत. ते उद्या (दि. १) सायंकाळपर्यंत नाशिकला पोहोचतील. दरम्यान, या घटनेमुळे सामाजिक, वैद्यकीय, विधी, क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. हे वृत्त कळताच डॉ. पूर्णपात्रे यांच्या घरी मान्यवरांनी गर्दी केली होती. जोड आहे...