जसोदाबेन यांच्यामुळेच नरेंद्र मोदींचा विजय - साक्षी महाराज
By Admin | Updated: December 9, 2014 13:18 IST2014-12-09T13:18:10+5:302014-12-09T13:18:10+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाचे श्रेय त्यांची पत्नी जसोदाबेन यांचेच असल्याचे भाजपाचे उन्नावमधील खासदार साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.

जसोदाबेन यांच्यामुळेच नरेंद्र मोदींचा विजय - साक्षी महाराज
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाचे श्रेय त्यांची पत्नी जसोदाबेन यांचेच असल्याचे भाजपाचे उन्नावमधील खासदार साक्षी महाराज यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे जसोदाबेन यांचे कौतुक करताना साक्षी महाराज यांनी त्यांची तुलना लक्ष्मण यांच्या पत्नीशी केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी दिल्लीतील आंबेडकर नगर येथे भाजपातर्फे प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत साक्षी महाराज यांनी जसोदाबेन यांचा उल्लेख केल्याने मंचावर उपस्थित नेतेमंडळी आणि कार्यकर्ते चक्रावून गेले. साक्षी महाराज म्हणाले, लक्ष्मण यांची पत्नी जशी वनवासादरम्यान त्यांच्यासोबत गेली नव्हती, मात्र त्यांच्यामुळेच लक्ष्मण यांनी अतुलनीय शक्ती दाखवली होती. तसेच नरेंद्र मोदींचे आहे. जसोदाबेन या उपवास आणि व्रताच्या माध्यमातून मोदींशी जोडलेल्या आहेत. मोदीजी जसे देश सांभाळत आहे तसेच दिल्लीदेखील सांभाळतील असे सांगत त्यांनी मोदींच्या नावावर मतांचा जोगवा मागितला.