भूसंपादनावर नरेंद्र मोदींची नरमाई

By Admin | Updated: February 28, 2015 05:29 IST2015-02-28T05:29:16+5:302015-02-28T05:29:16+5:30

वादग्रस्त भूसंपादन विधेयकापासून माघार नाहीच अशी भाषा सरकारकडून अगदी कालपर्यंत केली जात असताना शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi's slowdown on land acquisition | भूसंपादनावर नरेंद्र मोदींची नरमाई

भूसंपादनावर नरेंद्र मोदींची नरमाई

नवी दिल्ली : वादग्रस्त भूसंपादन विधेयकापासून माघार नाहीच अशी भाषा सरकारकडून अगदी कालपर्यंत केली जात असताना शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरमाई दाखवत प्रस्तावित विधेयकात सुधारणा करण्याची तयारी दर्शविली आहे. त्याचवेळी त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले व विरोधकांनी हा राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दा न बनविता समर्थन द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना मोदी म्हणाले की, अहंकार बाजूला ठेवा. आम्ही जे केले त्यापेक्षा चांगले असूच शकत नाही, अशी भाषा नको. काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारने २०१३ मध्ये जमीन कायदा पारित केला तेव्हा आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा भिडवत उभे ठाकले होते. तुम्हाला राजकीय लाभ घ्यायचा हे आम्हाला माहीत होते. तरीही आम्ही तुमच्यासोबत होतो, असे सांगत त्यांनी काँग्रेसला लक्ष्य बनविले. संपुआ सरकारने पारित केलेला जमीन कायदा शेतकऱ्यांच्या हिताला बाधक असल्याचे सांगत सर्व मुख्यमंत्र्यांनी त्यात बदल सुचविले होते. आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनी या कायद्याबाबत शेतकऱ्यांचा विचार करा, सिंचनाचा, पायाभूत सुविधांचा विचार करा अशी मागणी केली होती. सांघिक संरचनेत मुख्यमंत्र्याचा आवाज न ऐकण्याइतपत आम्ही मग्रूर नाही. आपण शेतकऱ्यांचे हित डावलू शकतो काय? चूक सुधारणे ही आपली जबाबदारी नाही काय? तुम्ही जे केले ते आम्ही नाकारत नाही. उगाच राजकारण करू नका, असे काँग्रेसला सुनावले.
‘मनरेगा’ हे अपयशाचे स्मारक !
७० मिनिटांच्या भाषणात मोदींनी मनरेगा, काळा पैसा, भ्रष्टाचार आणि कोळसा खाणपट्टे वाटप यासारख्या मुद्यांसह सांघिकतेला बळकटी देण्यासाठी राज्यांचे सबलीकरण, स्वच्छता मोहीम आणि जनधन योजनेचा उल्लेख केला. मनरेगा योजना बंद पडल्याची अफवा पसरवली जात आहे. काही क्षेत्रात माझ्याकडे हुशारी नाही, मात्र किमान राजकीय हुशारी तरी आहे. ही योजना बंद कशी पाडू? मनरेगा हे अपयशाचे स्मारकच आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेसची टर उडविली. स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे झाली तरी गरिबांना खड्डे खोदायला भाग पाडले जावे, असे तुम्हाला वाटते. तुम्ही काही चांगल्या गोष्टी केल्या, त्याच्या पाऊलखुणा उरल्या आहेत. हे लोकांना कळायला हवे, असे मोदी उपरोधिकपणे म्हणाले.

Web Title: Narendra Modi's slowdown on land acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.