नरेंद्र मोदींचा पोलिसांना 'स्मार्ट' मंत्र
By Admin | Updated: November 30, 2014 12:19 IST2014-11-30T12:18:54+5:302014-11-30T12:19:04+5:30
पोलिसांनी स्मार्ट म्हणजेच S - कठोर आणि संवेदनशील, M - मोबाईल आणि मोरल, A - जागरुक आणि दायित्त्व, R - विश्वासार्ह, T - टेक सेव्ही व्हावे असा मूलमंत्रही मोदींनी देशभरातील पोलिसांना दिला आहे.

नरेंद्र मोदींचा पोलिसांना 'स्मार्ट' मंत्र
ऑनलाइन लोकमत
गुवाहाटी, दि. ३० - चित्रपटांमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली असून त्यामध्ये सुधारणा होण्याची गरज आहे. पोलिसांनीही स्मार्ट म्हणजेच s - कठोर आणि संवेदनशील, M - मोबाईल आणि मोरल, A - जागरुक आणि दायित्त्व, R - विश्वासार्ह, T - टेक सेव्ही व्हावे असा मूलमंत्रही मोदींनी देशभरातील पोलिसांना दिला आहे.
पूर्वोत्तर राज्यांच्या दौ-यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी गुवाहाटीत पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांच्या अधिका-यांच्या परिषदेत पोहोचले. यात त्यांनी पोलिस अधिका-यांना मार्गदर्शन केले. देशाची गुप्तचर यंत्रणा सक्षम करण्यावर भर द्यायला हवा, ज्या देशांची गुप्तचर यंत्रणा अत्यंत मजबूत असते त्या देशांना शस्त्रास्त्रांवर अवलंबून राहावे लागत नाही असे मोदींनी सांगितले. आत्तापर्यंत ३३ हजार पोलिस आपली ड्यूटी निभावत असताना शहीद झाले आहेत, पोलिस आपल्या सुरक्षेसाठी शहीद झाले हे जनतेच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे असेही मोदींनी नमूद केले. शहीद पोलिसांच्या सन्मानासाठी स्पेशल टास्क फोर्सची स्थापना करावी आणि त्याच्या माध्यमातून शहीदांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवायला हवे आणि या शहीद जवानांवर पुस्तकही असायला पाहिजे, यामुळे नवीन पिढीला प्रेरणा मिळेल असे मोदींनी सांगितले.