नरेंद्र मोदींच्या घरी चहा अन् चिमटे...
By Admin | Updated: October 27, 2014 02:49 IST2014-10-27T02:49:39+5:302014-10-27T02:49:39+5:30
पंतप्रधान झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी नरेंद्र मोदी रालोआचा भाग असलेल्या सर्व पक्षांच्या खासदारांना रविवारी पहिल्यांदाच एकत्रित भेटले

नरेंद्र मोदींच्या घरी चहा अन् चिमटे...
जयशंकर गुप्त, नवी दिल्ली
पंतप्रधान झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी नरेंद्र मोदी रालोआचा भाग असलेल्या सर्व पक्षांच्या खासदारांना रविवारी पहिल्यांदाच एकत्रित भेटले. निमित्त दिवाळीचे आणि बेत चहापानाचा होता. प्रत्यक्षात सरकारच्या १५० दिवसांच्या कामगिरीचा आढावा आणि शिवसेनेसारख्या मित्रपक्षाशी असलेल्या संबंधांचा कस पडताळण्याचा अंतस्थ हेतू होता. स्वच्छता अभियानाची प्रशंसा आणि पुरस्कार करताना या अभियानात सक्रिय सहभाग देण्याचे आग्रही आवाहन मोदी यांनी केले. शिवसेनेच्या खासदारांनी मोदींच्या घरी चहाला हजेरी लावून शिवसेना रालोआतच असल्याचे स्पष्ट संकेत दिले. शिवाय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत झालेल्या चहा पार्टीत भाजपाला चिमटे काढण्याची संधीही शिवसेनेच्या खासदारांनी दवडली नाही.
राजधानीतील ७, रेसकोर्स या पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या चहापानाकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले होते. शिवसेनेचे खासदार त्यात सहभागी झाल्याने रालोआ तूर्तास तरी फुटली नसल्याचे संकेत मिळाले. पण उद्धव ठाकरे निमंत्रण नसल्याने हजर राहिले नाहीत. त्यावर हे चहापान फक्त खासदारांसाठी होते आणि कोणत्याही पक्षाचा खासदार नसलेला नेता त्यास हजर नव्हता, असा भाजपाकडून खुलासाही केला गेला. याचे निमंत्रण फक्त खासदारांसाठी असल्याने उद्धव त्यात सहभागी होण्याचा प्रश्नच नव्हता, असे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनीही स्पष्ट केले. रालोआचा भाग असलेले पण एकही खासदार नसलेले एमडीएमके आणि डीएमडीके हे पक्षही या चहापानाला हजेरी लावू शकले नाहीत. अर्थात हे कारण शिवसेनेच्या पचनी पडणे अंमळ कठीणच आहे. कारण याच चहा पार्टीत खासदार नसलेले भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि भाजपाचे काही ज्येष्ठ पदाधिकारी हजर होतेच की!
महाराष्ट्रातील सत्तेत शिवसेनेचा सहभाग असणार की नाही, याबद्दलचा तिढा अजूनही कायम असला तरी, उद्धव यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे बहुसंख्य खासदार चहापानाला हजर राहिले. राज्यसभा सदस्य संजय राऊत मुंबईत होते. पण केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या नेतृत्त्वाखाली आनंद अडसुळ, गजानन कीर्तीकर, अरविंद सावंत, कृपाल तुमाने, राजन विचारे, श्रीरंग भरणे, डॉ. श्रीकांत शिंदे आदी खासदार आधी महाराष्ट्र सदनात जमले आणि नंतर चहापानाला गेले. शिवसेनेच्या आणि एकूणच रालोआतील खासदारांना आपले मानून मोदींनी चहापार्टीसाठी बोलाविले, याबद्दल शिवसेनेच्या एका खासदाराने आनंद व्यक्त केला. त्याचवेळी आम्हाला भेटण्यासाठी मोदींना पाच महिन्यांनी का होईना आठवण झाली, असा चिमटाही काढला. आमच्यासमोर आम्ही रालोआचा भाग आहोत की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता, अशी खदखद कीर्तीकर यांनी बोलून दाखविली. उपस्थित खासदारांसमोर अरुण जेटली, नितीन गडकरी, डॉ. हर्षवर्धन, धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र सिंह तोमर आदी मंत्र्यांनी महत्वाच्या योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला.