पूँछमध्ये पंतप्रधान यायला ४० वर्षे लागली - नरेंद्र मोदी
By Admin | Updated: November 28, 2014 15:48 IST2014-11-28T15:48:51+5:302014-11-28T15:48:51+5:30
पूँछमध्ये तब्बल चाळिस वर्षांनंतर पंतप्रधान आले असल्याचे सांगत मोरारजी देसाईंनंतर इथे येणारा पंतप्रधान मीच असल्याचं प्रचारसभेत नरेंद्र मोदींनी सांगितलं.

पूँछमध्ये पंतप्रधान यायला ४० वर्षे लागली - नरेंद्र मोदी
>ऑनलाइन लोकमत
पूँछ (जम्मू व काश्मिर) दि. २८ - पूँछमध्ये तब्बल चाळिस वर्षांनंतर पंतप्रधान आले असल्याचे सांगत मोरारजी देसाईंनंतर इथे येणारा पंतप्रधान मीच असल्याचं प्रचारसभेत नरेंद्र मोदींनी सांगितलं. कच्छसारख्या वाळवंटी व मुसलमान मोठ्या संख्येने असलेल्या मागास भागात जोमानं विकास मी करून दाखवला आहे. आज कच्छमध्ये पाणी, रस्ते, रेल्वे, रोजगार अशा सर्व सोयी असून देशामध्ये सगळ्यात वेगाने प्रगती करणारा भाग म्हणजे कच्छ आहे. पूँछचा पण असाच कायापालट मी करून दाखवीन असं सांगत जम्मू व काश्मिरमध्ये भाजपाला संपूर्ण बहुमत द्या असं आवाहन मोदींनी केलं.
दिल्लीहून अब्जावधी रुपये जम्मू व काश्मिरमध्ये आले, परंतु अब्दुल्ला व मुफ्ती मोहम्मद या दोन परीवारांनी सगळे पैसे खाल्ले असून लोकांना काही मिळालं नाही असा आरोप मोदींनी केला.
मोदींच्या भाषणातील मुद्दे:
- अर्धी - अधुरी सरकार बनवू नका. बनवायचं तर संपूर्ण बहुमत असलेलं सरकार बनवा. अर्धे - अधुरे सरकार काही खरं नसतं. त्यामुळं जम्मू व काश्मिरमध्ये भाजपाचं बहुमत असलेलं सरकार बनवा.
- शौचालयाच्या अभावी मुली शाळा सोडतात. हे काम छोटं वाटत असेल पण माझ्यासाठी ते खूप मोठ्ठं आहे. लोक माझी खिल्ली उडवतात. हीच व्यथा काळोखात उघड्यावर शौचाला जावं लागणा-या महिलांची आहे. त्यामुळं प्रत्येक घरात शौचालय हवं.
- फक्त भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळवलीत तरी तुमचं अर्ध काम होईल. त्यासाठी या भ्रष्ट परीवारांना सत्तेपासून लांब ठेवा.
- परीवारवाद, वंशवाद, बिरादरीवाद ही काश्मिरला लागलेली कीड आहे. बाप - बेटा, बाप - बेटी या सगळ्यापासून मुक्त व्हा. भाजपा विकासासाठी, रोजगारासाठी मतं मागत आहे. भाजपाला सत्ता द्या.
- मी जम्मू व काश्मिरमध्ये स्क्रू टाईट केले आहेत आणि इथल्या सरकार व विरोधी पक्ष दोघांची अडचण केली आहे.
- जम्मू व काश्मिरमध्ये आत्तापर्यंत अब्जावधी रुपये दिल्लीतून पाठवण्यात आले, परंतु हे रुपये गेले कुठे? हा पैसा कोणी खाल्ला? असे विचारत मोदींनी अब्दुल्ला व मुफ्ती मोहम्मद या दोन परीवारांवर टीकास्त्र सोडले.
- ज्या ज्या लोकांनी जम्मू व काश्मिरबद्दल बरेवाईट उद्गार काढले होते त्यांना तुम्ही लोकांनी बुलेट बाजुला सारून बॅलटच्या माध्यमातून पराजित केलं आहे. त्यासाठी जम्मू व काश्मिरच्या लोकांचं अभिनंदन करावं तितकं कमी आहे.
- जम्मू व काश्मिरमध्ये ७० - ७२ टक्के मतदान करून लोकांनी विक्रम केला आहे. निवडणुकांचे निकाल कधीही लागोत, पण या मतदानाने हे सिद्ध केलंय की लोकतंत्राचा विजय झालाय.
- आत्तापर्यंत मी कधी काही मागण्यासाठी आलो नाही, परंतु आज मी मतं मागायला आलो आहे आणि जम्मू व काश्मिरचे लोक माझी झोळी भरतील अशी मला खात्री आहे.
- लोकांच्या व्यथा माझ्या व्यथा असतात, तुमच्या समस्या माझ्या समस्या असतात, तुम्हाला त्रास झाला तर मला त्रास होतो, मी असा प्रधानसेवक आहे.
- ज्यावेळी पूराने काश्मिरला ग्रासलं त्यावेळीही इथल्या नागरिकांचे अश्रू पुसायला मी आलो, एवढंच नाही तर आपल्या लोकांबरोबर दिवाळी साजरी न करता मी काश्मिरमध्ये दिवाळी साजरी केली, असा प्रधानसेवक मी आहे.
- जम्मू व काश्मिरमध्ये केवळ विकासाचा मंत्र घेऊन मी आलो. विकासाची स्वप्नं घेऊन आलो.
- याआधी पंतप्रधान संपूर्ण काळात एखादी फेरी मारायचे आणि काश्मिरचे कौतुक करायचे. त्या तुलनेत मी गेल्या सहा महिन्यात सहा वेळा जम्मू व काश्मिरमध्ये आल्याचं मोदी म्हणाले.
- भाजापाच्या प्रचाराचं काम एक सेवक म्हणून यापूर्वी करताना आपण पूंछमध्ये राहिलोय आणि इथल्या अनेक घरांमध्ये चहापाणी घेतलंय, रोटी खाल्लीय असं सांगत त्यांनी भाजपाला बहुमतांनी विजयी करण्याचं भावनिक आवाहन मोदींनी केले.