नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान की गुजरातचे - राज ठाकरे
By Admin | Updated: October 5, 2014 20:53 IST2014-10-05T20:31:30+5:302014-10-05T20:53:59+5:30
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर सुधारतील अशी आशा होती. मात्र अजूनही त्यांचे गुजरात एके गुजरात सुरुच आहे.ते देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे असा सवाल मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान की गुजरातचे - राज ठाकरे
ऑनलाइन लोकमत
भांडुप, दि. ५ - नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यावर सुधारतील अशी आशा होती. मात्र अजूनही त्यांचे गुजरात एके गुजरात सुरुच आहे. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे असा सवाल मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. भाजपला महाराष्ट्रात बाळासाहेबांनीच बळ दिले असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
रविवारी संध्याकाळी भांडुपमधील सभेत मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत गेल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केम छो मिस्टर प्राईम मिनीस्टर असे सांगत मोदींचे स्वागत केले. याऐवजी त्यांनी हिंदी भाषेत मोदींचे स्वागत केले असते तर आनंदच झाला असता. जगात मोदींना भारताचे पंतप्रधान म्हणून ओळखले जावे, गुजरातचे पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख निर्माण होऊ नये असे राज ठाकरेंनी सांगितले. महाराष्ट्रातील कोस्ट गार्डचे ट्रेनिंग सेंटर गुजरातमधील पोरबंदरला नेण्यात आले. पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद - मुंबई दरम्यान धावणार आहे. कोणता मराठी माणूस अहमदाबादला जातो, वेगात अहमदाबादला जाऊन ढोकळे खायचे काय ? याऐवजी दुस-या ठिकाणी ही बुलेट ट्रेन का सुरु झाली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन महाराष्ट्रातील मुंबईत येऊन गुंतवणूकदारांना मुंबईत गुंतवणूक कशाला करता, गुजरातमध्ये चला असे सांगतात. दुसरीकडे मोदी येऊन महाराष्ट्राच्या विकासाच्या गप्पा मारतात हे सर्व काय सुरु आहे असेही राज ठाकरेंनी निदर्शनास आणून दिले. राज्यात भाजपकडे सक्षम नेता नसल्याने त्यांच्या बॅनरवर फक्त मोदींचेच छायाचित्र झळकतात. स्वबळाची भाषा करणा-या भाजपचे ५० हून अधिक उमेदवार हे बाहेरुन आयात केले. राज्यात भाजपला बाळासाहेबांनीच बळ दिले असून तोच भाजप आता बेटकुळ्या दाखवत आहे असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.