एनडीएचे अध्यक्षपदही नरेंद्र मोदींकडेच ?
By Admin | Updated: May 19, 2014 11:07 IST2014-05-19T11:06:18+5:302014-05-19T11:07:16+5:30
भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिल्यावर नरेंद्र मोदींची भाजपवरील पकड आणखी मजबूत होणार असून एनडीएचे अध्यक्षपदही आता नरेंद्र मोदींच्या हाती येणार आहे.
एनडीएचे अध्यक्षपदही नरेंद्र मोदींकडेच ?
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १९ - भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिल्यावर नरेंद्र मोदींची भाजपवरील पकड आणखी मजबूत होणार असून एनडीएचे अध्यक्षपदही आता नरेंद्र मोदींच्या हाती येणार आहे. एनडीएचे विद्यमान अध्यक्ष लालकृष्ण आडवाणी यांना पक्षाच्या नेत्यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचे संकेत दिल्याचे समजते. एनडीएच्या अध्यक्षपदाऐवजी लालकृष्ण आडवाणींना आता लोकसभा अध्यक्षाचे पद देण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत भाजपला २८२ जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपप्रणीत एनडीएला ३३६ जागांवर विजय मिळाला आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्याकडेच एनडीएचे अध्यक्षपद होते. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदीदेखील पंतप्रधानपदासोबतच एनडीएचे अध्यक्षपद स्वतःकडे ठेवण्यास इच्छूक आहेत. सरकार व मित्रपक्षांसोबत समन्वय साधण्यात मोदींना सोपे व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. या निर्णयानंतर विद्यमान अध्यक्ष लालकृष्ण आडवाणींना एनडीएचे अध्यक्षपद सोडावे लागेल हे स्पष्ट झाले आहे. या पदाऐवजी आडवाणींना लोकसभा अध्यक्षपद दिले जाईल असे सांगितले जाते.
भाजपअध्यक्षही मोदींच्या मर्जीतला
राजनाथ सिंह व नितीन गडकरी हे भाजपचे आजी - माजी राष् अध्यक्ष मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यास इच्छूक आहेत. त्यामुऴे भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षही नरेंद्र मोदींच्या मर्जीतल्या नेत्यालाच दिले जाईल असे सूत्रांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून भाजप अध्यक्षपदासाठी इच्छूक असलेल्या काही नेत्यांनी मोदींची भेट घेतल्याचे वृत्त आहे.