Narendra Modi in Bihar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बिहारला 36 हजार कोटी रुपयांची भेट दिली. पूर्णिया विमानतळावरील नव्या टर्मिनलचे उद्घाटन करताना त्यांनी अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजनही केले. या वेळी आयोजित कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी स्पष्ट केले की, 'मागास समाजाला प्राधान्य आणि गरीबांची सेवा हेच माझे ध्येय आहे. देशाच्या विकासासाठी बिहारचा विकास अत्यावश्यक आहे.'
गरीबांसाठी पक्की घरे
पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'मागील 11 वर्षांत केंद्र सरकारने 4 कोटींहून अधिक पक्की घरे गरिबांना दिली आहेत. आता आणखी 3 कोटी घरे उभारण्याचे काम सुरू आहे. जोपर्यंत प्रत्येक गरीबाला पक्के घर मिळत नाही, तोपर्यंत मोदी थांबणार नाही,' असे ते म्हणाले.
काँग्रेस आणि राजदवर टीका
मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि राजदवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी आरोप केला की, 'काँग्रेस घुसखोरांना वाचवण्यात व्यस्त आहे, तर एनडीए सरकारने त्यावर बंदी घालण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. भारतामध्ये फक्त भारताचेच कायदे चालतील. जे घुसखोर आहेत त्यांना देश सोडावा लागेल. बिहारच्या लोकांना आता अपराधमुक्त राज्य हवे आहे. त्यामुळेच ते विरोधकांना योग्य उत्तर देतील. बिहारच्या जनतेला राजदचा जंगलराज माहिती आहे, त्यामुळे जनता एनडीएसोबत ठाम आहे,' असे मोदी म्हणाले.
सीमांचल व पूर्णियाच्या विकासावर भर
पंतप्रधान पुढे म्हणाले की, 'देशाच्या विकासासाठी बिहारचा विकास आवश्यक आहे आणि बिहारच्या विकासासाठी पूर्णिया व सीमांचलचा विकास महत्त्वाचा आहे. काँग्रेस आणि राजदच्या कुशासनामुळे या भागाला मोठे नुकसान सहन करावे लागले, परंतु आता एनडीए सरकारने परिस्थिती बदलली असून हा प्रदेश विकासाच्या मुख्य प्रवाहात आणला जात आहे.'