पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात' द्वारे देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी 'एआय इम्पॅक्ट समिट'पासून ते 'डिजिटल अरेस्ट'पर्यंत विविध विषयांवर भाष्य केलं आहे. भारतीय नागरिकांना सायबर फसवणुकीपासून वाचवण्यासाठी त्यांनी 'डिजिटल अरेस्ट' स्कॅमपासून पुन्हा एकदा सावध राहण्यास सांगितलं आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, सायबर गुन्हेगार प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि इतर लोकांना कॉल करतात. त्यानंतर त्यांचं बँक खातं रिकामं करतात, ज्यामुळे सामान्य लोकांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो. अनेक प्रकरणांमध्ये डिजिटल अटकेच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यभराची कमाई लुटली जाते असंही त्यांनी नमूद केलं. त्यामुळे लोकांनी अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे.
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?
डिजिटल अरेस्टमध्ये सायबर गुन्हेगार आपली खरी ओळख लपवून स्वतःला पोलीस, सीबीआय (CBI) किंवा नार्कोटिक्स अधिकारी असल्याचं भासवतात. त्यानंतर ते एखाद्याला कॉल करतात, त्यांच्यावर गंभीर आरोप लावतात आणि अटक करण्याची खोटी धमकी देतात. पोलीस, सीबीआय किंवा इतर सरकारी संस्थांचं नाव ऐकून अनेक लोक घाबरतात.
तपासाच्या नावाखाली गुन्हेगार पीडित व्यक्तीला दुसऱ्या शहरात येण्यास सांगतात. जर पीडित व्यक्तीने तिथे जाण्यास असमर्थता दर्शवली, तर त्याला 'ऑनलाईन तपासात' सामील होण्यास सांगितलं जातं. या काळात पीडित व्यक्तीला ही बाब कोणालाही न सांगण्याचा सल्ला दिला जातो. यालाच 'डिजिटल अरेस्ट' म्हटलं जातं.
"OTP कोणाशीही शेअर करू नका"
पंतप्रधान म्हणाले की, आपण सायबर गुन्हेगारांपासून सतर्क राहिलं पाहिजे आणि त्यांच्या जाळ्यात अडकता कामा नये. अशा प्रकरणांमध्ये आपली बँक खात्याची माहिती किंवा ओटीपी (OTP) कोणाशीही शेअर करू नका. तातडीने आपलं कुटुंब, मित्र आणि नातेवाईकांची मदत घ्या. तसेच यामध्ये पोलिसांचीही मदत घेता येईल.
सायबर गुन्हेगारांपासून सावध
KYC अपडेट किंवा Re-KYC अपडेट संदर्भात बँकेतून फोन आल्यास चिडचिड करण्याची गरज नाही, असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. हे तुमच्या सुविधेसाठी आणि बँक खातं सुरक्षित ठेवण्यासाठीच असतं. मात्र यातही सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावं आणि KYC संबंधित प्रक्रिया केवळ बँकेची शाखा किंवा अधिकृत एपद्वारेच पूर्ण करावी.
Web Summary : PM Modi cautioned citizens against 'digital arrest' scams during 'Mann Ki Baat'. Cybercriminals impersonate officials, threatening arrest to steal money. He urged people to be vigilant, not share OTPs, and seek help from family and police. Complete KYC processes only through official bank channels.
Web Summary : पीएम मोदी ने 'मन की बात' में 'डिजिटल अरेस्ट' घोटालों के खिलाफ नागरिकों को आगाह किया। साइबर अपराधी अधिकारी बनकर गिरफ्तारी की धमकी देकर पैसे चुराते हैं। उन्होंने लोगों से सतर्क रहने, ओटीपी साझा न करने और परिवार और पुलिस से मदद लेने का आग्रह किया। केवाईसी प्रक्रियाएं केवल आधिकारिक बैंक चैनलों के माध्यम से ही पूरी करें।