LokSabha Election 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे विद्यमान राज्यसभा खासदार आणि यूपीए सरकारमधील माजी रेल्वे राज्यमंत्री नारायण राठवा (Narayan Rathawa joins BJP) यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यांनी आज (27 फेब्रुवारी) मुलगा संग्राम सिंहसह भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला.
गुजरात भाजपचे प्रमुख सीआर पाटील (CR Patil) यांनी राठवा आणि इतरांना पक्षाच्या राज्य मुख्यालय आयोजित कार्यक्रमात पक्षात सामील करुन घेतले.
कोण आहेत नारायण राठवा?नारायण राठवा अशा काँग्रेस नेत्यांपैकी एक आहेत, ज्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ यावर्षी पूर्ण होत आहे. 2004 मध्ये छोटा उदेपूर लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले. या मतदारसंघातून ते पाच वेळा खासदार झाले आहेत. 1989 मध्ये त्यांनी पहिल्यांदा ही जागा जिंकली होती. मात्र, 2009 आणि 2014 मध्ये त्यांना दोनदा पराभवाला सामोरे जावे लागले.
राज्यसभेचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपणार गुजरातमधील छोटा उदेपूर येथील आदिवासी नेता राठवा यांचा राज्यसभा सदस्य म्हणून कार्यकाळ या वर्षी एप्रिलमध्ये संपणार आहे. राठवा यांचा मुलगा संग्रामसिंह याने 2022 ची गुजरात विधानसभा निवडणूक अनुसूचित जमाती (एसटी) - आरक्षित छोटा उदेपूर जागेवरुन काँग्रेस उमेदवार म्हणून लढवली होती, परंतु तो अयशस्वी ठरला. राठवा 2004 मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री होते.