(निनाद) अवजड वाहनांमुळे पोखरी घाट धोकादायक
By Admin | Updated: February 2, 2015 23:52 IST2015-02-02T23:52:56+5:302015-02-02T23:52:56+5:30
अपघात वाढले : रस्ता रुंदीकरणाची नागरिकांची मागणी

(निनाद) अवजड वाहनांमुळे पोखरी घाट धोकादायक
अ घात वाढले : रस्ता रुंदीकरणाची नागरिकांची मागणीडिंभे : मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील पोखरी घाटातील अवघड वळणांमुळे या रस्त्यावरील वाहतूक दिवसेंदिवस अवघड होत चालली आहे. डिंभे-भीमाशंकर या रस्त्यावरील अवघड वळणे काढून रस्तारुंदी करणाची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. आंबेगाव तालुक्यातून श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाण्यासाठी मंचर ते भीमाशंकर हा एकमेव मार्ग आहे. या मार्गावरील मंचर ते डिंभे हे अंतर सपाटीचे असले, तरी डिंभ्यापासून पुढे घाट रस्ता सुरू होतो. येथून पुढील रस्ता अरुंद व अवघड वळणांचा आहे. पोखरी घाटात तर अनेक वळणांवर या रस्त्यावरून जेमतेम एक गाडी जाईल, अशी परिस्थिती आहे. या वळणांवरून समोरून आलेले वाहन दिसत नसल्याने अनेकदा या ठिकाणी अपघात झाले आहेत. अवघड वळणे व अरुंद रस्ता यामुळे येथील वाहतूक धोकादायक झाली आहे. पोखरी घाट संपल्यानंतर पुढील रस्ता अतिशय अवघड वळणांचा बनला आहे. पोखरी गावच्या पुढील सेंद्र्याचे लवण हे तर या रस्त्यावरील अपघात प्रवणक्षेत्र बनले आहे. दिवसाआड येथे दुचाकी चारचाकी गाड्यांचे अपघात ठरलेले असतात. मागील आठवड्यात या वळणावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या वळणाबाबत या पूर्वीही अनेकदा वर्तमानपत्रातून वृत्त प्रसिद्ध झाली आहेत. मात्र, अजूनही रस्त्याच्या रुंदीकरणाला मुहूर्त मिळालेला नाही. या मार्गावर तळेघर, राजपूर, निगडाळे ते भीमाशंकरपर्यंत अनेक अवघड वळणांमुळे आंबेगाव तालुक्यातून भीमाशंकरकडे जाणारा रस्ता दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे. चौकट भीमाशंकरकडे जाण्यासाठी खेडमार्गेही दुसरा मार्ग आहे. परंतु हा रस्ता अतिशय अवघड व अरुंद आहे. मंदोशी घाटातील वळणे व उतार हा वाहतुकीसाठी धोकादायक आहे. शिवाय हा रस्ता पुढे तळेघरला मिळत असल्याने बहुतांश प्रवासी मंचर-भीमाशंकर याच मार्गाचा उपयोग करतात. पोखरी घाट वगळता आंबेगाव तालुक्यातून भीमाशंकरकडे जाणारा हा मार्ग एका अर्थाने सुखकरच आहे. या मार्गावरील अवघड वळणे काढून रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी या भागातील प्रवाशांकडून करण्यात येत आहे.सोबत-फोटो,१ फेब्रुवारी २०१५ डिंभे,पी१ओळी- पोखरी घाटातील अवघड वळणांमुळे मंचर-भीमाशंकर रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक होत आहे. या रस्त्यावरील अवघड वळणे काढून रस्त्याची रुंदी वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.छायाचित्र-कांताराम भवारी.