काळा पैसा दडवणा-यांची नावे जाहीर करणार, मोदींचे स्पष्टीकरण
By Admin | Updated: October 21, 2014 11:28 IST2014-10-21T11:28:39+5:302014-10-21T11:28:39+5:30
विदेशातील बँक खात्यांमध्ये काळा पैसा दडवणा-यांची काही नावे दिवाळीनंतर सुप्रीम कोर्टासमोर सादर करणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाला दिली आहे.

काळा पैसा दडवणा-यांची नावे जाहीर करणार, मोदींचे स्पष्टीकरण
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - विदेशातील बँक खात्यांमध्ये काळा पैसा दडवणा-यांची काही नावे दिवाळीनंतर सुप्रीम कोर्टासमोर सादर करणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाला दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत विदेशातील बँकांमध्ये दडलेल्या काळा पैसा हा नरेंद्र मोदींच्या प्रचारातील प्रमुख मुद्दा होता. सत्तेवर १०० दिवसांत हा काळा पैसा परत आणू व या खातेधारकांचे नावही जाहीर करु असे आश्वासन देणा-या मोदींना आत्तापर्यंत काळा पैशातील एक रुपयाही परत आणता आलेली नाही. यात भर म्हणजे गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने विदेशात बँक खाती असलेल्या भारतीयांची नावे जाहीर करता येणार नाही असे सुप्रीम कोर्टाला सांगितले. मोदी सरकारच्या या यू टर्नमुळे विरोधी पक्षांनी मोदींवर टीकेची झोड उठवली होती. मात्र आता मोदींनी या खातेधारकांची नावे जाहीर करु असे म्हटले आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळासाठी डिनरचे आयोजन केले होते. यामध्ये मोदींनी काळा पैशासंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले. 'काही नाव आपण जाहीर करु' असे मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळासमोर स्पष्ट केले. ज्यांच्याविरोधात चौकशी सुरु आहे असा मंडळींचीच नावे जाहीर केली जातील अशी भूमिका मोदींनी मांडली आहे. या डिनरमध्ये शिवसेना नेते व केंद्रीय मंत्री अनंत गीतेही उपस्थित होते.