मालेगाव स्फोटातील आरोपींबाबत मवाळ धोरण स्वीकारण्यासाठी दबाव टाकणा-या अधिका-याचे नाव उघड
By Admin | Updated: October 13, 2015 18:25 IST2015-10-13T17:58:27+5:302015-10-13T18:25:06+5:30
२००८ साली झालेल्या मालेगाव स्फोटातील आरोपींबद्दल मवाळ धोरण स्वीकारण्याचा संदेश नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सीमध्ये अधीक्षक पदावर कार्यरत असलेले सुहास वारके यांनी दिला होता, असा खुलासा रोहिणी सलियन यांनी केला

मालेगाव स्फोटातील आरोपींबाबत मवाळ धोरण स्वीकारण्यासाठी दबाव टाकणा-या अधिका-याचे नाव उघड
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - २००८ साली झालेल्या मालेगाव स्फोटातील आरोपींबद्दल मवाळ धोरण स्वीकारण्याचा संदेश नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सीमध्ये अधीक्षक पदावर कार्यरत असलेले सुहास वारके यांनी दिला होता, असा खुलासा या प्रकरणातील विशेष सरकारी वकिल रोहिणी सलियन यांनी केला आहे. 'जेव्हा रक्षकच भक्षक बनतो तेव्हा आपण काय अपेक्षा ठेवणार'? असे विचारत वारके यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सलियन यांनी केली.
२००८ च्या बॉम्बस्फोटांप्रकरणी अधिक बोलण्यास नकार देत दोन महिन्यांपूर्वीच एका प्रतिज्ञापत्रात वारके यांचे नाव नमूद करण्यात आले होते, असे सलियन यांनी स्पष्ट केले.
दरम्यान विशेष एनआयए न्यायालयाने सोमवारी प्रसाद पुरोहित याच्यासह मालेगाव स्फोटातील तीन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
मालेगाव स्फोटाप्रकरणी अटकेत असलेल्या कडव्या हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्त्यांबद्दल मवाळ धोरण स्वीकारा असा संदेश आपल्याला एनआयएच्या अधिका-याने दिला होता, असा गौप्यस्फोट सलियन यांनी यापूर्वीच केला होता. केंद्रात मोदींचं सरकार आल्यानंतरच हा बदल झाल्याचेही त्यांनी म्हटले होते.
२९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या मालेगाव स्फोटात ४ जण ठार, ७९ जण जखमी झाले होते. या स्फोटामागे कडव्या हिंदुत्ववादी संघटनाचा हात असल्याचं तपासात पुढे आलं. त्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह एकूण १२ जणांना अटक करण्यात आली होती.